भाईंदर: विरार परिसरातील शिरसाड फाटा येथे बनावट चलनाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. वसई क्राईम ब्रँच युनिट-२च्या पथकाने मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड फाटा पुलाखाली कारवाई करत तब्बल एक कोटी रुपये दर्शनी मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५०० रुपयांच्या तब्बल २० हजार बनावट नोटा आढळून आल्या. संशयावरून एका वाहनाची तपासणी केली असता त्यामधील बॅगेत मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा साठा आढळून आला. पोलिसांनी हा संपूर्ण मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
प्राथमिक तपासानुसार, या बनावट नोटा बाजारात सुमारे ३० लाख रुपयांना विक्री करण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या नोटा नेमक्या कुठून आणण्यात आल्या आणि त्या कोणाकडे पोहोचवल्या जाणार होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. बनावट नोटांच्या या रॅकेटमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच या टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्यासाठी तपास यंत्रणा कामाला लागली आहे. शिरसाट फाटा येथे झालेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून, बनावट चलनाचे हे नेटवर्क किती मोठे आहे, याबाबत आता पोलिसांच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.