अत्याधुनिक साधनांसह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमचा समावेश
ठाणे : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिकण्याचा अनुभव मिळावा, यासाठी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील आणखी ७० वर्ग डिजिटल करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत डिजिटल पॅनेल, संगणक, कॅमेरा, यूपीएस, स्टँड यांसह लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेने टप्प्याटप्प्याने डिजिटल वर्गांची संख्या वाढविण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या एकूण ६९ शाळा इमारतींमध्ये ६३७ वर्ग असून त्यापैकी आतापर्यंत ४५५ वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. उर्वरित वर्गही टप्प्याटप्प्याने डिजिटल करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे.
सन २०१९-२० मध्ये पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील २०० वर्ग डिजिटल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात आणखी ६३ वर्ग डिजिटल झाले. सन २०२५-२६ मध्ये ७२ वर्ग डिजिटल करण्यात आले असून, सीएसआरच्या माध्यमातूनही १०० वर्ग डिजिटल करण्यात आले आहेत. त्यामुळे डिजिटल वर्गांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा विस्तार करण्यावर महापालिकेचा भर आहे. यंदा आणखी ७० वर्गांसाठी डिजिटल यंत्रणा उभारण्यात येणार असून त्यासाठी सुमारे एक कोटी ९९ लाख ४६,३०० रुपयांची तरतूद आहे.यामध्ये उपकरणांची खरेदी, स्थापना, वाहतूक, मनुष्यबळ, तीन वर्षांचा देखभाल खर्च तसेच शिक्षकांचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
या डिजिटल वर्गांमध्ये ६५ इंचांचे इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनेल, OPS संगणक, कॅमेरा आणि यूपीएस यांचा समावेश असेल. त्यासोबत लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिमच्या माध्यमातून प्रवेश व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, उपस्थिती, परीक्षा व्यवस्थापन, बहुस्तरीय मंजुरी आणि इतर शैक्षणिक बाबी डिजिटल पद्धतीने हाताळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.