भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी नगरसेवकांसह पोलीस रस्त्यावर

अखेर कल्याणातील त्या भटक्या कुत्र्याला पकडले

कल्याण: कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसर ते खडकपाडा परिसरातील एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि गटनेते उमेश बोरगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे, भटक्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही रात्रभर परिसरात फिरत होते.

अखेर रात्री या कुत्र्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या भटक्या कुत्र्याला पकडले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आता मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रविवारी दुपारपासून हा भटका कुत्रा गाडीवर बसलेल्या, चालणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावण्याच्या तक्रारी आहेत. अचानक वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे अनेक नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एका दिवसात १३० नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी आले. त्यापैकी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या २५ नागरिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेतील ११ वर्षीय मुलीवर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला मुंबईतील शीव रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली.

रविवारच्या घटनेनंतर सोमवारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भटक्या श्वानाची दहशत पाहायला मिळाली. याठिकाणी १० ते १५ प्रवाशांना चावा घेतला. रुग्णालयात औषधांचे सॅम्पल दाखविण्यासाठी आलेला सेल्स मॅनेजरच भटक्या कुत्र्याची शिकार ठरला असून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच फार्मा कंपनीच्या सेल्स मॅनेजर अतुल सिंग यांना श्वानदंश झाला. सलग दुसऱ्या दिवशी श्वानाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार रविवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकुण 58 नागरीकांना कुत्रा चावल्याने रुग्ण उपचाराकरिता आले. त्यापैकी, 17 नागरीकांना संदीप हॉटेल बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. या रुग्णांना महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात, वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज लस व इतर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.