सहा लाखांहून अधिक शेतकरी झाले कर्जमुक्त

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या 5029 कोटी रुपयांचा हा पहिला हप्ता वर्ग करण्यात आला. या रकमेतून सहा लाख 22,207 शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. या योजनेची अंमलबजावणी करत असताना पहिल्या टप्प्यात कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होईल, दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर रक्कम वर्ग केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे. त्या योजनेच्या अंतर्गत आषाढी एकादशीला आपण पहिली यादी घोषित केली होती. घोषित केलेली यादी ही आपण सर्व ग्रामपंचायतींना पाठवली होती. शेतकऱ्यांनी केवळ आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. कुठलाही अर्ज नाही किंवा कुठल्याही प्रकारचे इतर गोष्टींची आवश्यकता नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ॲग्रीस्टॅक नंबर आणि आधार ऑथेंटिकेशन करून त्यांची कर्जखाती रिकामी करायची अशा प्रकारचे आपण काम हातामध्ये घेतले होते. आज जवळपास 5029 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सहा लाख 22,207 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये गेला आहे आणि ही खाती रिकामी झालेली आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

अजूनही जवळपास 18 ते 19 लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे. 12 लाख खाती बँकांना परत पाठवलेली आहेत. कारण बँकांनी त्यात चुका केलेल्या आहेत. बँकांनी साधारणपणे आठवड्याभरामध्ये त्या खात्यांमध्ये सुधारणा करुन पाठवणार असल्याचे सांगितल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.