नवी मुंबई : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश अधिक प्रभावीपणे रुजत असतानाच शाडूच्या गणेशमूर्तींच्या किमतीत १२ ते १५ टक्क्यांनी वाढ झाल्याने भाविकांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या खर्चातही वाढ होणार आहे.
नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर, ऐरोली, कोपरखैरणे, घणसोली, तळोजा परिसरात अनेक लहान-मोठ्या मूर्ती कार्यशाळा कार्यरत आहेत. या उद्योगातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असून हजारो कारागिरांना रोजगार उपलब्ध होतो. यंदाही अनेक कार्यशाळांमध्ये ग्राहकांच्या पसंतीनुसार विविध आकारांच्या मूर्ती तयार केल्या जात असून गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांकडून अंतिम टप्प्यातील रंगरंगोटी आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. शाडूच्या मातीपासून तयार होणाऱ्या मूर्तींना यंदाही मोठी मागणी असून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार करून अनेक भाविक प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) ऐवजी शाडूच्या मूर्तींना पसंती देत आहेत. मात्र शाडूची माती, रंग, सजावटीचे साहित्य, वाहतूक खर्च तसेच मजुरीत झालेली वाढ यामुळे मूर्तींच्या किमती १२ ते १५ टक्के वाढल्याचे मूर्तिकार सांगत आहेत.
मुंबई, पनवेल आणि ठाणे महापालिकांकडून मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देणे, वीज व पाणीपुरवठा, तात्पुरते शेड आणि अन्य मूलभूत सुविधा पुरवल्या जातात. मात्र नवी मुंबई महानगरपालिकेकडून अशा सुविधा अद्याप उपलब्ध होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मूर्तिकारांसाठी स्वतंत्र शेड उभारणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत नाही. त्यामुळे दरवर्षी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन करत कृत्रिम तलावांवर करोडो रुपये खर्च करणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेने मूर्तीकारांना देखील सुविधा दिल्या पाहिजेत, अशी मागणी श्री गणेश मूर्तिकार संघटनेचे अध्यक्ष संतोष चोलकर यांनी केली आहे.