मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, नातेवाईक आक्रमक
शहापूर : भारंगी नदी परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात बामणे येथील रहिवासी तथा टीडीआरएफ जवान विकास गोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी शहापूर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही,असा ठाम इशारा दिला आहे.
सोमवारी सकाळी विकास गोरे हे बुलेटवरून कर्तव्यावर जात असताना मुंबई-नाशिक महामार्गावरील भारंगी नदीजवळील मोठ्या खड्ड्यात वाहनाचा तोल जाऊन भीषण अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. विकास गोरे हे टीडीआरएफ दलातील धाडसी जवान म्हणून परिचित होते. नुकत्याच भिवंडीतील इमारत दुर्घटनेत त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले होते. संकटात धावून जाणाऱ्या अशा जवानाचा अखेर निष्काळजी प्रशासन आणि महामार्गावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झाल्याचा आरोप होत असून, परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थ शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झाले. रस्त्याच्या देखभालीस जबाबदार असलेल्या संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी त्यांची ठाम मागणी आहे. कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.
दरम्यान नातेवाईकांनी अपघातस्थळी जाऊन रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करत खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याचा दावा केला. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार अपघात होऊनही रस्त्याच्या दुरुस्तीकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
आमच्या विकासचा मृत्यू हा अपघात नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेला बळी आहे. रस्त्याच्या देखभालीस जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका विकासचे काका एकनाथ गोरे यांनी घेतली आहे.
या घटनेसाठी संबंधित एनएचएआय प्रशासनच निष्काळजीपणाच जबाबदार असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महामार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी मनसेचे वासींद शहराध्यक्ष अमोल बोराडे यांनी केली आहे.