आमदार संजय केळकर यांचा समन्वयातून मार्ग
ठाणे: जनसेवकाचा जनसंवाद या ११७व्या कार्यक्रमात शहरातील प्रलंबित एसआरए योजनांतील रहिवाशांनी उपस्थित राहून व्यथा मांडली. आमदार संजय केळकर यांनी अधिकारी आणि विकासक यांच्या समन्वयातून रहिवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अनेक पीडित रहिवाशांनी धाव घेत तक्रारी मांडल्या. वर्तकनगर येथील भीमनगर झोपडपट्टीचा एसआरए प्रकल्प क्लस्टरमधून बाहेर काढण्यात आल्यानंतरही प्रलंबित आहे. संबंधित विकासकाबाबत रहिवाशांच्या अनेक तक्रारी असून प्रकल्पाला चालना मिळत नाही. येथील पीडित ३५० कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी मी प्रयत्नशील असून लवकरच एसआरए अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
आंबेडकर रोड येथील एसआरए प्रकल्पातील सुमारे ४५० कुटुंबे हवालदिल असून त्यांचे प्रतिनिधी देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी श्री.केळकर यांनी संबंधित विकासकाला देखील निमंत्रित केले होते. बैठकीत क्लस्टर योजना राबवायची की एसआरए प्रकल्प राबवायचा यावर चर्चा करण्यात आली. सुमारे १९ वर्षे योजना रखडल्याने हक्काचे घर मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला असून लवकरच यातून मार्ग काढणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. यावेळी कापूरबावडी येथील गाळेधारकांनी देखील उपस्थित राहून व्यथा मांडली. हे रहिवासी गेले ५० वर्षे व्यवसाय करत असून अचानक त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आली आहे. या रहिवाशांचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील असून ठोस कार्यावहीचा आग्रह धरणार असल्याचे श्री.केळकर म्हणाले.
शहरात अनेक एसआरए प्रकल्प वर्षानुवर्षे रखडले असून विकासकांच्या भ्रष्ट कारभारामुळे रहिवासी हवालदिल झाले आहेत. अशा विकासकांवर एमपीआयडी अंतर्गत कारवाई करावी यासाठी मी अधिवेशनात सातत्याने आग्रह धरला आहे. शहरात जमीन बळकावण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत असून गुजरातच्या धर्तीवर कठोर कायदा आणण्याचा पुनरुच्चार श्री.केळकर यांनी केला.
कार्यक्रमात नगरसेवक सुनेश जोशी, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सुरेश कांबळे, नगरसेविका माधुरी मेटांगे, मगनभाई ठक्कर, राजेश गाडे, कैलास म्हात्रे आदी उपस्थित होते.
…आणि कष्टकऱ्याचे डोळे पाणावले
ठाण्यातील यल्लम्मा गायकवाड हे ट्रकचालक जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांचा मेहनतीचा मोबदला मिळाला नसल्याची व्यथा त्यांनी यापूर्वीही श्री.केळकर यांच्याकडे मांडली होती. श्री.केळकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्यांना काही रकमेचा चेक मिळाला. आज श्री.गायकवाड यांनी चेक दाखवून त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते.