ढोल-ताशांच्या नादात मुंबईतून पोहचले ठाण्यात
ठाणे: ढोल-ताशांच्या मिरवणुकीच्या मागे चालत चालत मुंबईतून (मुलुंड) थेट ठाण्यात पोहोचलेल्या दोन अल्पवयीन मुलांना ठाणे शहर वाहतूक शाखेच्या नौपाडा वाहतूक उपविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सुखरूप ताब्यात घेत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचविले. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य अनर्थ टळला आहे.
ठाण्यातील गजबजलेल्या तीनहात नाका सिग्नलवर ३० जुलै रोजी नौपाडा वाहतूक उपविभागाचे हेड कॉन्स्टेबल विनोद लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय पाटील हे बीट मार्शल म्हणून कर्तव्य बजावत होते. तेव्हा, जंक्शनवर दोन लहान मुले एकटीच फिरताना त्यांच्या निदर्शनास आली. संशय आल्याने दोन्ही मुलांना नौपाडा वाहतूक उपविभाग कार्यालयात आणण्यात आले. तेथे पोलिस उपनिरीक्षक महाडिक तसेच, नौपाडा वाहतूक उपविभागाच्या पोलीस निरीक्षक गौरी मोरे-पाटील यांनी मुलांची विचारपूस केली. मुलांनी आपली नावे आदित्य दगडे (१०) आणि उत्कर्ष चौरे (१०) अशी सांगितली असून दोघेही मुलुंड येथील गोशाळा परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले.
रस्त्यावर जात असलेल्या ढोल-ताशांच्या मिरवणुकीच्या मागे चालत चालत ठाण्यात आल्याचे दोघांनी सांगितले. मात्र, त्यांना कुटुंबातील कोणाचाही मोबाईल नंबर माहिती नव्हता. यानंतर नौपाडा वाहतूक पोलिसांनी तत्काळ मुलुंड पोलीस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. घाटेकर यांनी तातडीने हेड कॉन्स्टेबल वीर यांना ठाण्यात पाठविले. दोन्ही मुलांना त्यांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आले. त्यानंतर हेड कॉन्स्टेबल वीर यांनी मुलांना मुलुंड पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसमोर हजर केले आणि त्यानंतर दोघांनाही त्यांच्या घरी सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. वाहतूक पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेचे वाहतूक उपआयुक्त पंकज शिरसाट यांनी कौतुक केले आहे.