दोन सख्ख्या भावांचा समावेश
ठाणे : भिवंडी येथील नारपोली भागात गंगारामवाडी परिसरातील कोहिनुर अपार्टमेंट ही अवघी १४ वर्षे जुनी चार मजली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला. या धोकादायक इमारतीचे दुरुस्ती काम करणाऱ्या चार मजुरांचा देखील यात समावेश आहे. इतर दोन जण जखमी असून त्यांना उपचारासाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना गुरुवारी रात्री ११च्या दरम्यान घडली.
भिवंडी महापालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार इमारत धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडीट करण्यापासून इमारत रिकामी करण्यापर्यंतच्या तीन नोटीसा गेल्या सहा वर्षांत देण्यात आल्या होत्या. याशिवाय पाणी आणि वीज पुरवठाही खंडित करून रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही महापालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे दुरुस्ती सुरू ठेवण्यात आली होती. ही माहिती मिळताच सहायक आयुक्तांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी इमारतीची संरचना अस्थिर झाल्याचे दिसून आले. गुरुवारी रात्री ८ ते ९ च्या दरम्यान कट कट असा आवाज येऊ लागल्याने महापालिकेच्या पथकाने दुरुस्ती करणारे मजूर तसेच ११ कुटुंबांतील सुमारे ३५ ते ४० रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यास सुरुवात केली. कंत्राटदार व मजुरांना काम तत्काळ बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, काही रहिवाशांनी बाहेर पडण्यास नकार दिला. त्याचवेळी इमारतीचा मागील भाग कोसळण्यास सुरुवात झाली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये शमीम शेख (32), रंजीत सिंग (45), मिराज शेख (34), संतोष पांडे (42), शमीम अन्सारी (30), अशोक कुमार पासवान, त्याचा सख्खा भाऊ राकेश कुमार पासवान, मामाचा मुलगा मुकेश पासवान आणि किस कुमार आदींचा समावेश आहे. जखमींना भिवंडी येथील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. दरम्यान, महापालिका आयुक्तांनी विनापरवानगी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल आणि श्वान पथकाच्या साह्याने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरीकांचा शोध सुरू करण्यात आला.
मृतदेह उत्तर प्रदेशात न्यायचे कसे?
इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांमध्ये अशोक कुमार पासवान, त्याचा सख्खा भाऊ राकेश कुमार पासवान, मामाचा मुलगा मुकेश पासवान आणि किस कुमार यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील एकाच गावचे हे सर्व रहिवासी होते. भिवंडीतील कोहिनूर इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी ते चार दिवसांपासून येथे काम करत होते. मात्र, गुरुवारी अचानक इमारत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली अडकून चौघांचाही मृत्यू झाला. अशोक कुमार पासवान हा आपल्या कुटुंबातील एकमेव कमावणारा सदस्य होता. त्याची पत्नी आणि तीन लहान मुले त्याच्यावरच अवलंबून होती. त्याचा भाऊ राकेशही त्याला कामात मदत करत होता. मात्र, इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनं एका क्षणात दोन्ही भावांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. अशोकची पत्नी आणि मुलांचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या डोळ्यांतही अश्रू आले. दरम्यान, चारही मृतदेह उत्तर प्रदेशातील गावी नेण्यासाठी सुमारे 1 लाख 20 हजार रुपयांचा खर्च सांगितला जात असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी प्रशासनाकडे ॲम्बुलन्सद्वारे मृतदेह मोफत गावी पोहोचवण्याची मदत करण्याची विनंती केली आहे.
हृदयद्रावक घटनांनी हळहळ
रणजीत सिंह कोहिनूर अपार्टमेंट ए विंग मध्ये तिसऱ्या मजल्यावर राहत असून कोहिनूर बी विंग इमारतीचे पिलर दुरुस्तीचे काम सुरू होते. मात्र, अचानक इमारतीच्या खाली आरडाओरडा सुरू झाल्याने रणजीत सिंह आपल्या आजारी पत्नीला औषध देऊन तू 10 मिनिट थांब मी खाली बघून येतो असे म्हणत इमारतीच्या खाली गेला आणि तो पुन्हा परतलाच नाही. इमारत कोसळल्याची बातमी पत्नीला मिळाल्यानंतर पत्नीने एकच आकांत केला. तर संतोष पांडे हे इमारत धोकादायक नोटीस लागल्यापासून मागील दोन ते तीन दिवसांपासून इमारतीत राहत नव्हते. त्याऐवजी ते आपल्या व्यवसाय करत असलेल्या हॉटेलमध्येच झोपायचे. परंतु, आज इमारतीत नक्की काय काम चाललंय, कसं काम चाललंय हे पाहण्यासाठी ते इमारतीच्या खाली आले होते. त्या ठिकाणी पाहणी करत असतानाच अचानक संपूर्ण इमारत कोसळली आणि त्यात संतोष पांडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.