सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी (श.प.)ची मुंब्र्यात निदर्शने

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

ठाणे : नीट (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटीप्रकरणी आणि आंदोलनकर्ते सोनम वांगचूक यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने मुंब्र्यात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निदर्शनांत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

मुंब्र्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसेच नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी मर्जिया शानू पठाण म्हणाल्या की, सोनम वांगचूक हे मागील २० दिवसांपासून नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीविरोधात शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेण्याऐवजी त्यांना जबरदस्तीने रुग्णालयात दाखल करणे आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणे लोकशाहीला शोभणारे नाही.

देशाच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची आवश्यकता असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर बळाचा वापर करणे निषेधार्ह असल्याचे सांगत, तरुणांनी अन्यायाविरोधात संघटितपणे आवाज उठविल्याचेही त्यांनी नमूद केले.