आज-उद्या ठाण्याला रेड अलर्ट

जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी

ठाणे : मागिल तीन दिवस ठाण्यात मुसळधार पाऊस पडत असून उद्या आणि परवा दोन दिवस अति मुसळधार पाऊस पडणार असल्याने दोन दिवस ठाण्याला रेड अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस धोक्याचे असल्याने ठाणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्यांना उद्या शनिवारी सुट्टी देण्यात आली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत मागिल तीन दिवस पाऊस कोसळत आहे. आतापर्यंत ठाण्यात ७१६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर पावसाची रीप रीप सुरु होती. या पावसात दिवसभरात शहरात सुमारे १५ ते १६ झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान हवामान विभागाने ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत ४ आणि ५ जुलै रोजी अति मुसळधार पाऊस पडणार असून सोसाट्याचा वारा वाहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे, त्यामुळे पुढील दोन दिवस धोक्याचे असून ६ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्या उद्या शनिवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.