अंबरनाथमध्ये मीटर फोडून मनसेचा महावितरणला दणका

अंबरनाथ : वीज खात्याकडून सध्या स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मीटर फोडून तीव्र नाराजी व्यक्त केली. मनसेचे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली वीज खात्याच्या कार्यालयासमोर मीटर फोडून आंदोलन करण्यात आले.

आधीचे वीज मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत. मात्र पूर्वीपेक्षा अधिक वीज बिल येत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून करण्यात येत आहे, तसेच ग्राहकांच्या परवानगी शिवाय महावितरणचे ठेकेदार आणि प्रशासन स्मार्ट मीटर बसवत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. वाढीव वीजबिले, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार आणि ग्राहकांच्या विविध समस्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असतानाच आता स्मार्ट मीटर बसविण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. तसेच ४८ तासांनंतर तुमचे मीटर बदलण्यात येतील,” असे संदेश अनेक ग्राहकांना प्राप्त झाल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक देऊन स्मार्ट मीटरविरोधात उग्र आंदोलन केले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत महावितरण कार्यालयासमोर वीज मीटर फोडून महावितरणच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. शहरात कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर बसवू देणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली. यानिमित्ताने विविध मागण्यांचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. येत्या आठ दिवसांत याबाबत समाधानकारक तोडगा निघाला नाही, अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही मनसेच्या वतीने देण्यात आला.