जिल्ह्यात १,९७,६९४ बालकांना पोलिओ डोस देण्याचे उद्दिष्ट

१,८७८ लसीकरण बूथ, १,३४७ घरभेट पथके सज्ज

ठाणे : देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या राष्ट्रीय उद्दिष्टाला बळकटी देण्यासाठी २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी ठाणे जिल्ह्यात व्यापक सूक्ष्म नियोजन पूर्ण करण्यात आले आहे.

या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सुमारे एक लाख ९७,६९४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ग्रामीण व शहरी भागात मिळून १८७८ लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून, त्यावर कार्य करण्यासाठी ४३४८ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. बूथच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी ३७४ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये यासाठी विशेष घरभेट मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील अंदाजे सहा लाख ६९,७७३ घरांना भेटी देण्यासाठी १३४७ पथके कार्यरत राहणार असून, या कामासाठी एकूण ५३२३ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २६३ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले असून, त्यांचे एकूण १०३६ पर्यवेक्षक-दिवस नियोजित करण्यात आले आहेत.

बसस्थानके, रेल्वे स्थानके, तपासणी नाके आणि स्थलांतरित नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणीही विशेष लक्ष देण्यात आले आहे. अशा ठिकाणी ६८ ट्रान्झिट पथके कार्यरत राहतील. यासाठी २५७ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले असून २७ पर्यवेक्षक या कामावर देखरेख ठेवतील. याशिवाय दुर्गम आणि विशेष परिस्थितीतील भागांमध्ये सेवा पोहोचविण्यासाठी ८८ मोबाईल पथके तयार ठेवण्यात आली असून त्यांचे ३१७ पथक-दिवसांचे नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील ३६ आरोग्य संस्था (प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये व इतर आरोग्य सुविधा) सहभागी होणार असून, ७६ वैद्यकीय अधिकारी तसेच ३४ जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक मोहिमेवर लक्ष ठेवणार आहेत. लसींची गुणवत्ता अबाधित राखण्यासाठी आवश्यक शीतसाखळी व्यवस्थाही सक्षम करण्यात आली आहे. यासाठी ४२२५ कोल्ड चेन उपकरणे, १२९२ लस वाहक तसेच नोंदणी व व्यवस्थापनासाठी ४४७६ मार्कर पेन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.