बदलापूर: बदलापूरमध्ये भरदिवसा झालेल्या दुहेरी हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे. जुवेली परिसरात आज दुपारी झालेल्या घटनेने बदलापूर हादरले आहे.
बदलापूर पूर्वेतील जुवेली परिसरात एका रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाजवळ एक महिला आणि एका ओला चालकाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस, फॉरेन्सिक पथक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मनिषा भोसले यांच्या तीन वर्षांच्या मुलासह परिचित असलेल्या गणेश शिंदे यांच्या चारचाकी वाहनातून घरातून बाहेर पडल्या होत्या. काही वेळानंतर दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
मृतावस्थेत असलेल्या महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःवरही वार केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दुर्दैवी घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.