भिवंडी मनपातील सहायक आयुक्ताला लाच घेताना अटक

भिवंडी : मंगळवारी सायंकाळी शहरातील पद्मानगर येथील महापालिकेच्या प्रभाग समिती क्र.३ चे सहायक आयुक्त सुरेंद्र भोईर (५२) यांना त्यांच्या कार्यालयाजवळ कारमध्ये सुमारे अडीच लाख रुपयांची लाच घेताना पकडले.

भिवंडी महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र.३ च्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करीत असलेल्या साईड सुपरवायझरकडे सहायक आयुक्त सुरेंद्र भोईर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. तसेच पहिला हप्ता म्हणून अडीच लाख रुपये स्विकारण्याची तयारी दाखविली.

या प्रकरणी सुपरवायझरने ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी तक्रारीची दखल घेत पद्मानगर येथील पालिकेच्या प्रभाग कार्यालयामध्ये सापळा लावला. तेव्हा प्रभाग समिती क्र.३ कार्यालयाच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात काल मंगळवारी सायंकाळी ७ वाजता कारमध्ये लाचेची अडीच लाख रुपयांची रक्कम स्विकारतांना सहायक आयुक्त सुरेंद्र भोईर यांना रंगेहात पकडले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन भिवंडीतील त्याच्या घराची देखील झडती घेतली. ही घटना घडल्यानंतर शहरात आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली.

सध्या उपलब्ध माहितीनुसार सन २०२१ मध्ये पालिकेच्या भविष्य निर्वाह निधी अधीक्षक आनंद जगताप यास चार हजाराची लाच घेताना पकडले. २०२४ साली अजय गायकवाड या लिपिकास घरपट्टी प्रकरणी लाचलुचपत विभागामार्फत कारवाई झाली होती. याच वर्षी दीड लाखाची लाच स्वीकारताना कर मुल्यांकन विभागाचे सहायक आयुक्त सुदाम जाधव, कार्यालयीन अधीक्षक सायराबानो अन्सारी व लिपिक किशोर केणे यांच्यावर नवी मुंबई लाचलुचपत विभागाने कारवाई केली. तर २०२५ मध्ये प्रभाग समिती ४ चे सहायक आयुक्त सुनील भोईर व बिट निरीक्षक अमोल वारघडे यांनी ५० हजार लाच स्वीकारल्याप्रकरणी त्यांच्यावर मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी ब्रांच यांनी कारवाई केली. सध्याच्या २०२६ मध्ये प्रभाग समिती क्र.३ चे सहायक आयुक्त सुरेंद्र भोईर यास अडीच लाख रुपयांची रक्कम घेताना पकडले.