शहर विकास विभागात आग; संगणक-कागदपत्रे जळून खाक

ठामपाच्या चौथ्या मजल्यावर पुन्हा संशयाचा धूर!

ठाणे: नेहमी वादग्रस्त ठरलेल्या ठाणे महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात पाहते अचानक आग लागून दोन संगणक आणि काही कागदपत्रे जळून खाक झाली. या आगीबाबत भाजपासह ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसने संशय व्यक्त करत थेट आरोप केले. या आरोपांमुळे पुन्हा एकदा हा विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

संगणक असलेल्या रुमला आग लागल्याची घटना सकाळी घडली. सुदैवाने सुरक्षा रक्षकांनी काही मिनिटांतच आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र ही आग लागली कि कोणी लावली, अशी उलट-सुलट चर्चा शहरात सुरू झाली आहे.

महापालिकेतील चौथ्या मजल्यावर शहर विकास विभाग आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरातील इमारतींच्या आराखड्यांना मंजुरी दिली जाते. या विभागातील अधिकारी-कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम करत असतात. काल रविवार असल्याने हा विभाग बंद होता. आज सोमवारी सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी आगीची सूचना देणारा अलार्म वाजू लागल्याने महापालिकेच्या महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान विष्णू मोरे यांनी शोध घेत चौथ्या मजल्यावर धाव घेतली. शहर विकास विभागातून धूर येत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांचे सहकारी प्रशांत जाधव श्री. दुरगुडे यांनी मुख्यालयातील पाच ते सहा अग्निशमन बाटल्याच्या मदतीने सुमारे १० ते १५ मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. प्रशांत जाधव यांनी संपूर्ण विभागाचा वीजपुरवठा बंद केला तर श्री. मोरे यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती दिली, तोपर्यंत या तीन सुरक्षा जवानांनी संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवले होते.

या आगीत शहर विकास विभागातील दोन संगणक आणि ‘डी. पी. रिमार्क’ असलेली किरकोळ कागदपत्रे जळून खाक झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. या आगीचे कारण अद्याप समजले नाही परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

याबाबत शहर विकास विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या आगीत काही किरकोळ कागदपत्रे जळाली असून ती कागदपत्रे कुठल्याही मंजुरीसंबंधित नव्हती. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी ‘डी.पी. रिमार्क’चे काम सुरु होते.

याबाबत आग विझविणारे सुरक्षा जवान विष्णू मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आग लागल्याची सूचना देणारे अलार्म वाजल्याने आम्ही प्रत्येक मजल्यावर पाहणी केली. चौथ्या मजल्यावरून धूर येत असल्याचे लक्षात येताच आग विझविण्याचा बाटला घेऊन ही आग आम्ही तिघांनी विझविली, अशी माहिती दिली.

आग लागल्याची माहिती मिळताच महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी भेट देऊन आगीची चौकशी करण्याची मागणी घेतली.

याच विभागात आग कशी लागते?- नारायण पवार

महापालिका मुख्यालयात इतर अनेक विभागांऐवजी नेमकी शहर विकास विभागातच आग कशी लागते? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे. शहर विकास विभागातील टीडीआर मंजुरीसह विविध फाईलसंदर्भात सीबीआय, लाचलुचपत विभाग, उच्च न्यायालयात चौकशी सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी आगीची भीती व्यक्त केल्यानंतरही महापालिकेने कोणतीही सतर्कता घेतली नव्हती, असा आरोप करीत नारायण पवार यांनी आगीत जळालेल्या व गायब झालेल्या प्रत्येक फाईलचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

हा योगायोग नाही- काँग्रेस

शहर विकास विभागासारख्या संवेदनशील विभागात वारंवार आग लागणे ही केवळ योगायोगाची बाब मानता येणार नाही. जळालेल्या फाईल्सची माहिती तातडीने जाहीर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करावी. नागरिकांचा विश्वास टिकवायचा असेल तर प्रशासनाने पूर्ण पारदर्शकता दाखवली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केली आहे.