विधान परिषद निवडणुकीत भाजप ११ जागा लढणार

शिंदे गट चार तर राष्ट्रवादीला दोन जागा
मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी  अखेर महायुतीचे अंतिम जागावाटप निश्चित झाले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे-प्रतिदाव्यानंतर 17 जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये एकमत झाले आहे. अंतिम फॉर्म्युलानुसार भाजप 11, शिवसेना चार तर राष्ट्रवादी दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. अतिरिक्त एक जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादीला यश मिळाले आहे तर सात जागांवर अडून बसलेल्या शिवसेनेला वंजारी जागांवर समाधान मानावे लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच राज्यात न झाल्याने या मतदारसंघामध्ये पूर्वी निवडून आलेल्या आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येऊनही निवडणूक होऊ शकली नाही. अशात, गेल्या दोन-अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात. सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे.
भाजपच्या वाट्याला सोलापूर, जळगाव, भंडारा-गोंदिया, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, नागपूर, छ.संभाजीनगर-जालना, अहिल्यानगर, सांगली-सातारा आणि नांदेड या ११ जागा आल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाकडे ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळ तर राष्ट्रवादी काँग्रेसला कोकण आणि पुणे या दोन जागा मिळाल्या आहेत.