विधान परिषद निवडणुकीत भाजपला शह देण्याचा प्रयत्न
ठाणे: ठाण्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळविण्यासाठी आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने डाव टाकला आहे. त्यांचा पाठिंबा मिळवून भाजपावर दबाव टाकून शिवसेना शिंदे गट महायुतीच्या जागा वाटपामध्ये आघाडी घेणार असल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ठाणे विधान परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत मोठे आणि धक्कादायक पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. वसई-विरारमध्ये वर्चस्व असणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला थेट शिवसेनेत विलीन करण्याचा प्रस्ताव शिंदेंनी ठाकूर पिता-पुत्रांना दिल्याची खळबळजनक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
या मोठ्या राजकीय खेळीमुळे शिवसेना भाजपावर दबाव टाकून ठाण्यासाह राज्यातील सहा जागा मिळविण्यासाठी यशवी होण्याची खेळी खेळत असल्याचे बोलले जात आहे
या सर्व घडामोडींदरम्यान, बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर हे अचानक आपल्या खासगी गाडीने मुंबईला रवाना झाले होते, मात्र राज्यातील जागा वाटपातील तिढा सोडवण्यासाठी श्री.शिंदे हे दिल्लीला रवाना झाल्याने ही भेट होऊ शकली नाही.
ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघातून शिवसेनेचे माजी आमदार रवींद्र फाटक हे स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. रवींद्र फाटक यांनी स्वतः वसईत जाऊन हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या भेटीनंतर वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा पूर्णपणे शिवसेनेला मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. आगामी काळात मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी आणि ठाण्यावर पूर्ण वर्चस्व राखण्यासाठी शिवसेनेने ही मोठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे.
बहुजन विकास आघाडीची वसई-विरार महानगरपालिकेत एकहाती सत्ता राहिलेली आहे. बविआकडे सध्या तब्बल 71 नगरसेवकांचे तगडे संख्याबळ आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे संख्याबळ अत्यंत निर्णायक मानले जाते. जर बहुजन विकास आघाडीने शिवसेनेला पाठिंबा दिला किंवा पक्षात विलीनीकरण केले, तर त्याचा थेट आणि सर्वात मोठा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला विजय मिळवण्यासाठी होणार आहे. अर्थात, या सर्व पेचात अंतिम उमेदवार कोण असेल, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घेणार आहेत.
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून 2026 रोजी मतदान होणार असून 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने महायुतीत सहा जागांची आग्रही मागणी केली होती. यामध्ये प्रामुख्याने नाशिक, ठाणे आणि जळगावच्या जागांचा समावेश होता. आतापर्यंत महायुतीच्या बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनुसार, शिवसेनेला ठाणे, नाशिक, यवतमाळ आणि परभणी या चार जागा सुटल्याची माहिती मिळत आहे.