गुन्हेगाराला अचूक टिपणाऱ्या ‘बेली’ने घेतला अखेरचा श्वास!

कर्तव्य बजावताना उष्माघाताने पोलीस श्वानाचा मृत्यू

ठाणे : गरीब आणि शांत स्वभाव, परंतु चोर-दरोडेखोर आणि गुन्हेगारांचा अचूक माग घेणाऱ्या ग्रामिण पोलिस दलातील एकमेव बेली श्वानाचा गुन्हेगाराला शोधताना उष्माघाताने करूण अंत झाला. तिच्या मृत्यूमुळे ग्रामिण पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे ग्रामिण पोलिस दलात नऊ वर्षांपूर्वी दाखल झालेल्या डॉबरमॅन जातीची ही स्त्री जातीची श्वान होती. काल कल्याण ग्रामिण भागातील एका खुनाच्या गुन्ह्याचा तपासात मार्गदर्शन करण्यासाठी तिला सकाळी १०.३० वाजता नेण्यात आले होते. या भागात तापमान फार जास्त होते. उन्हात ती पोलिसांना तपासामध्ये मार्गदर्शन करत होती. दुपारी अडीच वाजता तिला वागळे येथिल निवासस्थानी आणण्यात आले होते. संध्याकाळी तिला जेवण देण्यासाठी हॅण्डलर गेले असता ती निपचित पडलेली पोलिसांच्या लक्षात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ग्रामिण पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात असून आज सोमवारी शासकीय इतमामात बेलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दोन महिन्यांची असताना बेली ग्रामिण पोलिस दलात दाखल झाली होती. तेव्हापासून ती चोख कर्तव्य बजावत होती. आजवर तिने १५ गुन्हेगारांवर थेट झडप घातली होती तसेच १००पेक्षा जास्त गुन्ह्यांत तिने पोलिसांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे ग्रामिण पोलिस गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकले होते.

युनिटला कोणी आले आणि तिच्या बरोबर ओळख झाल्यानंतर तो अधिकारी किंवा कर्मचारी तिच्या प्रेमात पडत होता. अतिशय गरीब आणि प्रेमळ असलेली बेली पुढील वर्षी निवृत्त होणार होती. तिने आम्हाला लळा लावला होता. पहिल्या दिवसापासून ती माझ्या सानिध्यात होती, त्यामुळे निवृत्तीनंतर मी तिला माझ्या घरी नेणार होतो. आमच्या घरच्यांची देखील ती इच्छा होती, परंतु आमची इच्छा पूर्ण झाली नाही. ती गेल्यामुळे आमच्या घरातील सदस्य गेल्यासारखी आमची मनःस्थिती झाली आहे, अशा भावना बेलीचे प्रशिक्षक समिर डिके यांनी दिली.