प्रस्थापितांच्या विरोधात युवकांच्या मनात रोष वाढतोय – आ. आव्हाड

ठाणे: ठाणे शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाने पेपरफुटी, बलात्कार, बेरोजगारी याविरोधात एकत्र येत आंदोलन केले. या आंदोलनात मोदी आणि मेलोनी यांची वेषभूषा केलेल्या तरूण-तरूणींनी मेलोडी चाॅकलेटचे वाटप केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डाॅ.जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम हे रस्त्यावर उतरले.

सोमवारी दुपारी मासुंदा तलावाच्या कट्ट्यावर अनोखे आंदोलन केले. काॅक्रोच पार्टीच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेले रॅप गाणे वाजवून तरूणांनी फ्लॅशमाॅब केले. विशेष म्हणजे, मोदी आणि मेलोनीच्या वेशभूषेत आलेल्या तरूणांनी चक्क मोदी-मेलोनींचा अभिनय करीत उपस्थितांना मेलोडी चाॅकलेट वाटप केले. शिवाय, मोदींनी मेलोडीचे नव्हे तर बेरोजगारीचा प्रमोशन करावे, असे आवाहन केले.

डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले, “भारताचे सन्माननीय सरन्यायाधीश सुर्य कांत यांनी देशातील तरूणांना झुरळ संबोधले होते. त्यातून काॅक्रोच जनता पार्टी सोशल मिडीयावर जन्माला आली आहे. आपल्या देशात अनेकांना शिक्षण मिळत नाही. ज्यांना शिक्षण मिळते, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळेच तरूण वैफल्यग्रस्त झाले आहेत. या वैफल्यग्रस्त तरूणांना काॅक्रोच म्हणणे संयुक्तिक नाही. भारतात जगातील सर्वाधिक युवाशक्ती आहे. या युवाशक्तीचा उद्रेक होईल, असेच हे भाष्य आहे. भारताची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. परराष्ट्र धोरण पुरते फसले आहे. अशा स्थितीत काॅक्रोच हा तरूणांसाठी केलेला शब्दप्रयोग अंगाशी आला आहे. आज काॅक्रोच जनता पार्टीचे 25 मिलियन फाॅलोवर्स झाले आहेत. तेवढे कोणत्याही राजकीय पक्षाकडे नाहीत. यावरून तरूणांच्या मनातील राग दिसून येत आहे.”

मनोज प्रधान यांनी, काॅक्रोच जनता पार्टी ही सरकारविरोधातील भावना असल्याचे सांगितले. हे आंदोलन करणारे तरूण आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत. त्यांनी मदत करण्याची विनंती केली होती. आम्ही त्यांच्या बोलवण्यावरूनच आंदोलनात सहभाग घेतला आहे, असेही प्रधान यांनी स्पष्ट केले.

आंदोलनात राष्ट्रवादी (श.प.) च्या वतीने नगरसेवक यासीन कुरेशी, सुधीर भगत, शाकिर शेख, नगरसेविका मनिषा भगत यांच्यासह मिलिंद बनकर, गजानन चौधरी, माधुरी सोनार, शशी पुजारी, कैलास हावळे, महेश मोरे आदी सहभागी झाले होते.