मोहनेतील एनपीएल कंपनी परिसरातील शेकडो झाडे सुकली

रासायनिक पदार्थ वापरल्याचा संशय; चौकशीची नागरिकांची मागणी

कल्याण : मोहने येथील एनपीएल कंपनी परिसरातील झाडे अचानक सुकल्याची धक्कादायक घटना समोर आली असून नागरिकांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अंदाजे शंभर ते दीडशे झाडे काही दिवसांतच पूर्णपणे वाळल्याचे दिसून येत असून झाडे मुद्दाम रासायनिक पदार्थ टाकून सुकवण्यात आल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.

राज्यात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असतानाच कल्याणजवळील या घटनेने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता वाढली आहे. परिसरातील निलगिरीची अनेक झाडे अचानक कोमेजून गेल्याने हरित पट्ट्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी रासायनिक पावडर किंवा केमिकलचा वापर करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून झाडे सुकण्यामागील नेमके कारण शोधावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. वन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके यांनी केली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून प्रशासन या प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.