राज्यात पुढील दोन दिवस वादळी पाऊस

मुंबई: राज्यात एकीकडे उष्णतेची तीव्र स्थिती असून काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची नोंद होत आहे. दरम्यान, वादळी पावसाचा प्रभाव वाढताना दिसत असून यामुळे अनेक जिल्ह्यांना शुक्रवारीही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

या दरम्यान, ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. म्हणून काही जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

सध्या संपूर्ण देशात मान्सून पूर्व घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. उत्तरेच्या राज्यात दिल्ली आणि उत्तरप्रदेशसह अनेक भागात वादळाची स्थिती असून पावसाची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असून यामुळे नागरिकांना तीव्र उन्हापासून तात्पुरता दिलासा मिळत आहे.

बुधवारीही नागपूर आणि सातारा येथे पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी हवामान राहील, अशी शक्यता वर्तविली आहे. यामुळे या प्रदेशातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर याच प्रदेशातील अनेक भागात उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती असून येथे कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदली जात आहे. यामुळे काही जिल्ह्यांमध्ये पावसामुळे दिलासा तर काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उन्हामुळे नागरिकांची होरपळ होत आहे.

दरम्यान, दक्षिण बंगालच्या उपसागरात मोसमी पावसाला अनुकूल स्थिती असून अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर १६ मे रोजी मोसमी पावसाचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे यंदा पाऊस वेळेवर दाखल होणार असून. सध्या त्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. १६ मे रोजी अंदमानात मोसमी पाऊस धडकल्यास आणि त्याचा पुढील प्रवासात काही अडथळा उभा न राहिल्यास राज्यातही पावसाचे आगमन वेळेआधी होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड आदी भागांना शुक्रवारी पावसाचा ‘येलो अलर्ट’ हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा आणि सातारा घाट विभाग, पुणे आणि पुणे घाट विभाग आणि बीड आदी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.