मनसेचे नाल्यात उतरून फुटबॉल आंदोलन

ठाणे: ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नालेसफाईचे १०० टक्के दावे केले असले तरी, प्रत्यक्षात मात्र गांधीनगर, सुभाषनगर, वर्तकनगर, लोकमान्यनगर आणि इंदिरानगर यांसारख्या भागांतील नाले कचऱ्याने तुडुंब भरलेले आहेत. या ढिसाळ कारभाराचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून फुटबॉल खेळत आंदोलन केले.

जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. दरवर्षी ठाणे महानगरपालिकेकडून प्रभाग समितीनिहाय नालेसफाईची आकडेवारी जाहीर केली जाते. मात्र यंदा अद्याप अशी कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नसल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. नालेसफाईची कामे ठेकेदारांना देण्यात येतात, मात्र संबंधित प्रभाग समित्यांतील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे फक्त देखाव्यापुरती साफसफाई केली जात असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात येत आहे. प्रत्यक्षात नाले तुंबलेल्या अवस्थेत असतानाही कोट्यवधी रुपयांची देयके मंजूर केली जात असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, पाऊस उंबरठ्यावर असतानाही नाले उपसले न गेल्याने ठाणेकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जर वेळेत नालेसफाई झाली नाही, तर पावसाळ्यात सखल भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. या संपूर्ण प्रकाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नाल्यात फुटबॉल खेळून आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी थेट नाल्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. तसेच ठाणे महानगरपालिका आयुक्तांना जाब विचारत तातडीने प्रभावी नालेसफाई करण्याची मागणी करण्यात आली.

ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी यंदा नालेसफाईवर ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्ष पाहणीत नाले कचऱ्याने भरलेले असून ड्रोनचा मागमूसही लागत नाहीय. आयुक्तांची ड्रोनची कबुली फक्त कागदावरच उरली असून, प्रत्यक्षात नाले सफाईच्या नावाखाली केवळ धूळफेक सुरू आहे, अशी टीका मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केली आहे.