परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश
मुंबई: सुट्टी काळ, सण उत्सव काळातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन खाजगी वाहतूकदार तिकिटांचे दर मनाला येईल तसे आकारतात. त्यांच्यावर कोणाचेही बंधन नाही. अक्षरश प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. त्यावर आता परिवहन विभाग निर्बंध घालणार आहे.
राज्यातील खासगी प्रवासी बस वाहतूकदारांकडून सुट्टीकाळात बेकायदेशीर दरवाढ केली जाते. अनधिकृत मोबाईल ॲप्सद्वारे प्रवाशांची होणारी आर्थिक फसवणूक याबाबत शासन गंभीर आहे. या प्रवाशांच्या फसवणूकी विरोधात दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येणार आहेत. प्रवाशांना होणारा आर्थिक त्रास आणि इतर गैरसोयीचा अभ्यास करणारी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
स्थापन करण्यात येणारी समिती खासगी बसच्या भाडेवाढीवर नियंत्रण कशा प्रकारे मिळवण्याची गरज आहे, अवैध बुकिंग ॲप्सना कसा आळा घालता येईल, प्रवाशांच्या तक्रारींवर कशाप्रकारे प्रभावी उपाययोजना करता येतील, याचा सविस्तर अहवाल सादर करेल. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील बैठकीत अवाजवी भाडेवाढीच्या विरोधात उपाययोजना जाहीर केल्या जातील. सध्या अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या अनधिकृत ॲप्सच्या माध्यमातून प्रवाशांचे बुकिंग करीत असल्याच्या तक्रारी आहेत. सण,उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांकडून जास्त तिकीट दर आकारले जातात. प्रवाशांची आर्थिक लूट करणाऱ्या अशा प्रवासी बस वाहतूकदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांची लूट होता कामा नये, असा इशारा सरनाईक यांनी दिला.