भाऊ तोरसेकर यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान
ठाणे: विश्व संवाद केंद्र, मुंबई यांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा प्रतिष्ठेचा देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार गणेश (भाऊ) तोरसेकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याचे यंदा २६वे वर्ष होते.
नॅशनल स्टॉक एक्सचेंज, बीकेसी, वांद्रे येथे शनिवार ९ मे रोजी झालेल्या या दिमाखदार गौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे लेखक आणि लोकनीती तज्ञ संदीप वासलेकर, भारतीय लष्करातील माजी आयुध महासंचालक लेफ्टनंट जनरल (नि.) आर. आर. निंभोरकर, लेखक आणि विचारवंत प्रशांत पोळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री.बल्लाळ यांना गौरविण्यात आले.
या सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार गणेश (भाऊ) तोरसेकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर एनडिटीव्हीचे जितेंद्र दीक्षित, डॉ. मयूर परिख आणि टाइम्स नाऊ नवभारतचे राकेश त्रिवेदी, सकाळचे संजीव भागवत, युवा पत्रकार श्रेणीत झी २४ तासच्या मनश्री पाठक आणि मुंबई तरुण भारतचे सागर देवरे, उत्कृष्ट वार्ताहर म्हणून पुढारीचे गौरीशंकर घाळे, तर समाजमाध्यमांतील वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीबद्दल आकाश दांडेकर, माणिक रेगे (इंस्टाग्राम) आणि आकाश भावसार (यूट्यूब) यांनाही सन्मानित करण्यात आले.