जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाचा शतकोत्सव दिमाखात

नागरिकांच्या ७० टक्के समस्या सोडविण्यात यश-आ. केळकर

ठाणे: जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाचा लाभ केवळ ठाणेकरांनीच नाही तर आसपासच्या भागातील नागरीकांनीही घेतला. अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या सुमारे ७० टक्के समस्या सोडविण्यात यश आल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.

खोपट येथील भाजपच्या कार्यालयात आज १००वा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शतकी उपक्रमानिमित्त उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय केळकर यांचे औक्षण केले. फुले उधळून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी केक कापून शतकोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार संजय केळकर म्हणाले, नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी भाजपची जनता दरबाराची संकल्पना जुनी आहे. आता जनसेवकाचा जनसंवाद या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविण्यात येत आहेत. अडल्या-नडल्या, गरजू, अन्यायग्रस्त, वंचित आणि दुर्लक्षित नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमास केवळ ठाणे शहरच नव्हे तर आसपासच्या शहरांतूनही नागरिक तक्रारी घेऊन येत आहेत. आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि अन्य सहकार्य लाभत असल्याचे श्री. केळकर यांनी सांगितले.

उपक्रमात महापालिका, पोलीस प्रशासन, वन विभाग, एसआरए, आरोग्य विभाग अशा विविध विभागांशी संबंधित तक्रारींची निवेदने प्राप्त होत असतात. केवळ निवेदने न स्विकारता संबंधित नागरिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असतो. विकासकांकडून होणारी रहिवाशांची फसवणूक, फायनान्स कंपन्यांकडून होणारी आर्थिक फसवणूक, महापालिकेतील कंत्राटी कामगारांवरील अन्याय, पालिका कर्मचारी, शाळा प्रवेश, पालकांच्या तक्रारी, अपुरा पाणी पुरवठा, गॅस जोडणी, वारसा हक्क प्रकरणे, वनविभागाशी संबंधित समस्या, अशा अनेक विषयांशी संबंधित निवेदने प्राप्त होत असतात. आजवर सुमारे ७० टक्के समस्या सोडविण्यात आम्हाला यश आले आहे तर इतर समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा कायम असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हे व्यासपीठ यापुढेही सुरू राहणार असल्याचे श्री. केळकर यांनी स्पष्ट केले.

आज झालेल्या उपक्रमात ४०० हून अधिक नागरिक उपस्थित होते. नागरिक, भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि महिला मोर्चाच्या वतीने श्री. केळकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक सीताराम राणे, विकास पाटील, सुरेश कांबळे, सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, माधुरी मेटांगे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, संतोष साळुंखे, सुरज दळवी, दीपक गायकवाड, रक्षा यादव उपस्थित होते.