शहापूर: शहापूर तालुक्यातील डोळखांब वनपरिक्षेत्रात गेल्या अनेक दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा मुक्त वावर सुरू असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे तीव्र वातावरण निर्माण झाले आहे.
२१ एप्रिल २०२६ रोजी लाद्याच्या वाडीतील अवघ्या १० वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती. मात्र घटना घडून तब्बल २० दिवस उलटूनही संबंधित बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आलेले नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
घटनेनंतर ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांनी वन विभागाकडे वारंवार निवेदने देऊन तातडीने कारवाईची मागणी केली. परिसरात पिंजरे, कॅमेरे आणि शोधमोहीम सुरू असल्याचे वन विभागाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात बिबट्याचा वावर अद्याप कायम असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कॅमेऱ्यांमध्ये बिबट्याची हालचाल स्पष्ट दिसून येत असतानाही त्याला जेरबंद करण्यात अपयश येत असल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
डोळखांब परिसरातील बहुतांश आदिवासी व ग्रामीण कुटुंबांचा उदरनिर्वाह जंगलावर अवलंबून आहे. करवंदे, आंबे, आवळा, जांभूळ यांसारखी वनउत्पादने गोळा करून विक्री करणे हा अनेक कुटुंबांचा प्रमुख रोजगार आहे. मात्र बिबट्याच्या भीतीमुळे नागरिक जंगलात जाण्यास धजावत नसल्याने अनेक कुटुंबांचा रोजगार पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यामुळे आर्थिक संकट अधिक गडद बनले असून अनेक कुटुंबांपुढे उदर-निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याच काळात शेतकरी व आदिवासी बांधवांकडून शेतीपूर्व मशागत, भाजणी,पालापाचोळा गोळा करणे तसेच पावसाळ्यापूर्व तयारीची कामे केली जातात. परंतु जंगल परिसरात सतत बिबट्याचा वावर असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. परिणामी शेतीची पूर्वतयारी रखडली असून आगामी खरीप हंगामावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महिला, लहान मुले आणि शेतमजूर यांच्यामध्ये सतत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक गावांमध्ये नागरिक सायंकाळनंतर घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत आहेत. काही गावांमध्ये पालकांनी लहान मुलांना एकटे बाहेर पाठवणे बंद केले असून ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णतः असुरक्षित बनले आहे.
दरम्यान शहापूर तालुक्यासारख्या विस्तीर्ण वनक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी रेस्क्यू टीम नसणे ही गंभीर बाब असल्याचे श्रमजीवी संघटनेने म्हटले आहे. प्रत्येक वेळी मुंबई-बोरिवली येथील रेस्क्यू पथकाची प्रतीक्षा करावी लागत असल्याने तातडीची कारवाई होण्यास विलंब होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शहापूर तालुक्यात स्वतंत्र व कायमस्वरूपी वन्यप्राणी रेस्क्यू टीम स्थापन करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
शहापूर तालुका हा शंभर टक्के पेसा क्षेत्र असून येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव वास्तव्यास आहेत. अशा संवेदनशील परिस्थितीत प्रशासन आदिवासी बांधवांच्या जीवित सुरक्षेकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. वन विभागाने तातडीने संबंधित बिबट्याला जेरबंद करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांच्या भावना व तीव्र रोष व्यक्त करण्यासाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने १८ मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता डोळखांब वनपरिक्षेत्र कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार असून वन विभागाने तातडीने ठोस कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा श्रमजीवी संघटनेचे तालुका अध्यक्ष मालू हुमणे व तालुका सचिव प्रकाश खोडका यांनी दिला आहे.दरम्यान संबंधित निवेदन देतांना ग्रामपंचायत कळभोंडेचे पोलीस पाटील भालचंद्र खडके, ग्रामस्थ सोमनाथ वाघ,श्रमजीवी संघटनेचे तालुका कार्यालयीन सचिव कमलाकर शिंदे, डोळखांब गट अध्यक्ष राम हिलम तसेच गट सचिव गोपाळ हंभीर आदी उपस्थित होते.