जीत पाटील याची राष्ट्रीय मिलिटरी स्कूल बेंगळुरू येथे निवड

शहापूर: शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रशाळा अल्याणी येथील विद्यार्थी जीत पाटील याने अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश प्रक्रियेत उल्लेखनीय यश संपादन करून ठाणे जिल्ह्याचा मान उंचावला आहे. जीत याचा राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, बेंगळुरू येथे इयत्ता सहावीपासून पुढील शिक्षणासाठी प्रवेश निश्चित झाला आहे.
अभ्यासातील सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर जीतने एका वर्षात सलग तीन केंद्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवले. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल प्रवेश परीक्षेत त्याने १५० पैकी १३६ गुण मिळवले. ऑल इंडिया सैनिक स्कूल प्रवेश परिक्षेमध्ये ३०० पैकी २८४ गुण संपादन केले. जवाहर नवोदय विद्यालय निवड परिक्षेमध्ये ९७.५ टक्के गुण मिळवत ठाणे-पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर राजस्थानमधील अजमेर येथे झालेली मुलाखत तसेच मिलिटरी हॉस्पिटल, खडकी येथे झालेल्या वैद्यकीय चाचण्या जीतने यशस्वीरित्या पूर्ण केल्या. त्यानंतर ७ मे २०२६ रोजी त्याने  बेंगळुरू येथे प्रवेश घेतला.
देशसेवेसाठी सक्षम आणि जबाबदार अधिकारी घडविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून देशभरात केवळ पाच राष्ट्रीय मिलिटरी स्कूल चालविल्या जातात. या शाळांमध्ये संरक्षण दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ९० टक्के तर सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांसाठी केवळ १० टक्के जागा राखीव असतात. यावर्षी देशभरातून निवड झालेल्या ३६५ विद्यार्थ्यांमध्ये फक्त ३६ सामान्य विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यामध्ये शहापूर तालुक्यातील जीत पाटील याची निवड विशेष अभिमानाची बाब मानली जात आहे.