मुरबाडमधील प्रकार, अधिकारी हतबल, ग्रामस्थांचे उपोषण
ठाणे: बारवी प्रकल्पग्रस्तांच्या वसाहतीतील राखीव जागेवर बांधकाम करणाऱ्या एका अतिक्रमणधारकाने कायदा व सुव्यवस्थेचे नाव देऊन `एमआयडीसी’कडून होणारी जमिनीची मोजणी थांबवली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
गावातील अंतर्गत भूखंडाऐवजी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाठबळामुळे रस्त्यालगतच्या राखीव जागेवर बिनधास्तपणे बांधकाम करणाऱ्या अतिक्रमणधारकावर कारवाई करण्यात `एमआयडीसी’चे अधिकारी हतबलता दाखवत आहेत. या पार्श्वभूमीवर संतप्त मोहघर ग्रामस्थांनी ठाण्यात बुधवारी उपोषण करून प्रशासनावर कारवाईची आग्रही मागणी केली. या प्रकारामुळे मुरबाड तालुक्यातील `एमआयडीसी’च्या बेजबाबदार कारभारावर प्रकाश पडला आहे.
बारवी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन केलेल्या मोहघर गावातील मार्केटसाठी राखीव जागेचा ताबा `एमआयडीसी’तील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने एका ग्रामस्थाला दिला असल्याच्या निषेधार्थ वागळे इस्टेट येथील `एमआयडीसी’ कार्यालयाबाहेर ग्रामस्थांनी बुधवारी उपोषण केले. तसेच राखीव जागेवरील बांधकामाला स्थगिती देण्याची मागणी केली.
बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर विस्थापित झालेल्या मोहघर येथील कुटुंबांचे मुरबाड-कर्जत रस्त्यावरील म्हसा गावानजीकच्या ७५ भूखंडावर पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसन आराखड्यानुसार मोहघर येथील राखीव जागेवर मार्केट उभारण्याचे नियोजन होते. एका प्रकल्पग्रस्ताला भूखंड क्र. ४७ ब प्रदान केल्याचे दाखविण्यात आले. परंतु, त्याने `एमआयडीसी’ कार्यालयातील तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांबरोबर संगनमताने परस्पर रस्त्यालगतच्या राखीव जागेवर बांधकाम सुरू केले आहे, असा आरोप सरपंच सीमा भोईर, बारवी प्रकल्पपिडीत संघटनेचे अध्यक्ष कमलाकर भोईर आणि पोलिस पाटील रामचंद्र भोईर यांनी केला. त्याविरोधात ग्रामस्थांनी `एमआयडीसी’ कार्यालयाबाहेर उपोषण केले. तसेच राखीव जागेवरील बांधकाम हटविण्याच्या मागणीचे निवेदन प्रादेशिक अधिकारी नितीन चव्हाण यांना दिले. त्यानंतर प्रशासनाने लेखी उत्तर पाठविले. `एमआयडीसी’ प्रशासनाने भूखंड क्र. ४७ ब चा ताबा दिला असल्याचे पत्रात स्पष्ट केल्यानंतरही कारवाईसाठी टाळाटाळ केली जात आहे. यापूर्वी ग्रामस्थांनी `एमआयडीसी’कडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्यानंतर ग्रामपंचायतीने `एमआयडीसी’कडे दाद मागितली आहे.
मोहघरच्या सरपंचांना पाठविलेल्या पत्रात, पुनर्वसित गावठाणामधील सर्व भूखंडाची संयुक्त पाहणी करण्यासाठी ५ मे रोजी `एमआयडीसी’ च्या ठाणे प्रादेशिक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी जागेवर गेले होते. त्यावेळी भूखंड क्र. ४७ ब च्या भूखंडधारकाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगून मोजणीसाठी मज्जाव केला. त्यामुळे आगामी काळात वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेऊन लवकरात लवकर मोजणी व राखीव भूखंडावरील अतिक्रमण झाले असल्यास कारवाईचे आश्वासन प्रादेशिक अधिकारी नितीन चव्हाण यांनी दिले आहे.
या पत्राबद्दल सरपंच सीमा भोईर यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ एका अतिक्रमणधारकाच्या आक्षेपानंतर अधिकाऱ्यांनी माघार का घेतली. जादा पोलिस बंदोबस्त का घेण्यात आला नाही, असा सवाल सरपंच सीमा भोईर यांनी केला.