खा. शिंदे यांची हार्वर्ड-वारी!

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी अलिकडेच विश्वविख्यात हार्वर्ड विद्यापीठातून ‘इन्क्लुसिव्ह ग्रोथ’ अर्थात ‘सर्वसमावेशक विकास’ या विषयाचे आठवडाभराचे प्रशिक्षण घेतले. लोकप्रतिनिधींनी आपल्या कर्तव्याला ज्ञानाची जोड देणे केव्हाही स्वागतार्ह असते. डॉ.शिंदे हे सुविद्य आहेतच आणि तरी त्यांना ज्ञानाच्या कक्षा वाढवण्याची इच्छा झाली, याचा आनंद आहे. खास करुन आपले राजकारण, आपले लोकप्रतिनिधी, त्यांच्या कामगिरीबद्दल व्यक्त होत असलेल्या प्रतिक्रिया आदींबाबत फार आशादायक चित्र उमटताना दिसत नाही. अधोगतीच्या या प्रवासात एखाद्या खासदाराला आपल्या हातून काही चांगले होऊ शकते ही जाणीव होणे हे तसे विस्मयकारकच! त्यामुळे डॉ.शिंदे यांनी लोकप्रतिनिधींकडे पहाण्याची चौकट एक प्रकारे मोडून जनतेच्या मनात आशेचे चित्र निर्माण केले आहे.
कुतुहलापोटी आम्ही या आठवडाभराच्या अभ्यासक्रमाची माहिती जमवली आणि ती वाचताना डॉ.शिंदे यांनी ग्रहण केलेले ज्ञान प्रत्यक्षात आणले तरी कल्याण-डोंबिवलीतील मतदारांच्या अपेक्षापूर्तीच्या ते जवळ जातील असे वाटले. या विद्यापीठात (हार्वर्ड बिझनेस स्कूल) शिकवणाऱ्या प्राध्यापिका ॲमी एडमंडसन यांचे सर्वसमावेशक विकासाला धरून मांडलेले विचार वाचायला मिळाले. त्यांच्या पुस्तकाचे नावच खूप रोचक वाटले. राइट काइंड ऑफ राँग: दी सायन्स ऑफ फेलिंग वेल. याचा ढोबळ मराठी अनुवाद केला तर योग्य चुका: चुकण्याचे शास्त्र! चुकांतूनच माणसला त्या सुधारण्याचे नवे मार्ग सापडतात, परंतु चुकांचे अवलोकन, त्यातून योग्य बोध घेणे वगैरे पुढचा घटनाक्रम चुकांच्या वारंवारपणामुळे, सदोष नियोजनामुळे, संशयास्पद व्यवहारामुळे आणि पारदर्शकतेच्या अभावामुळे करण्याचे नैतिक धाडस निर्णयप्रक्रियेतील घटकांमध्ये राहिलेले नाही हे मान्य करावे लागेल. त्यामुळे चुकांकडे पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन ठेवला जातो. हे भय, मग ते सार्वजनिक टीकेचे असो की गंभीर आरोपांचे, त्या चुका सुधारण्यापासून परावृत्त करतात. आपली सर्व सरकार व्यवस्था आणि सामाजिक रचना चुकांबद्दलच्या या दृष्टीकोनामुळे व्यापली आहे.
डॉ. शिंदे यांच्याशी यशावकाश त्यांचे हार्वर्डचे अनुभव आम्ही समजून घेऊच, परंतु सर्वसमावेशक विकास या संकल्पनेचा भारतीय सरकार व्यवस्थेत पूर्णपणे अभाव आहे, हे मान्य करावे लागेल. त्याची उदाहरणे शेकडोंनी आपल्याला दिसतील. रस्ते रुंद होतात, परंतु गॅरेजेस ते व्यापून टाकतात, त्यामुळे उड्डाणपूल बांधूनही कोंडीतून मुक्तता होत नाही. पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण होत नाहीत, कारण विविध खात्यांत समन्वय नसतो. एखादा नागरी प्रकल्प गरज नसताना राबवण्याची अनेक उदाहरणे सापडतील. अशा काही ठळक उदाहरणांत सर्वसमावेशकतेचा अभाव दिसतो. डॉ. शिंदे यांना हे सनातन प्रश्न चांगले ठाऊक आहेत. त्यांचे उत्तर त्यांना हार्वर्डला नक्कीच सापडले असणार. एरवी चुका दाखवणे, आरोप-प्रत्यारोप करणे आणि मूळ प्रश्नापासून फारकत घेणे, हे आपल्या व्यवस्थेचे ठळक लक्षण बनले आहे.
चुकांमध्येही दोन प्रकार असतात, असे प्रा.एडमंडसन यांनी लिहिले आहे. ‘गूड फेल्युअर आणि बॅड फेल्युअर’. एखादी बाब चुकीची आहे असे समजून घेतले तर ती टाळता येते. यासाठी जनसहभागाची आवश्यकता आहे. आम्ही अनेकदा असा विचार मांडला आहे की प्रत्येक शहरात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञमंडळी असतात. उदाहरणार्थ उत्तम स्थापत्य अभियंते, अनुभवी वास्तुविशारद, सकारात्मक पर्यावरणस्नेही, इतकेच काय, उत्तम लेखक, कलाकार, पत्रकार, निवृत्त अधिकारी ही सर्व मंडळी शहराचा विचार करीत असतात. त्यांना निर्णय प्रक्रियेत किंवा अंमलबजावणीच्या वेळी सामावून घेतले जात नाही. डॉ. शिंदे यांनी त्यास महत्त्व दिले तर त्यांच्या या परदेश अध्ययनवारीचे सार्थक झाले, असे म्हणता येऊ शकेल.
सरकार नामक यंत्रणेची प्रतिमा सुधारायची असेल तर सर्वसमावेशकता हाच पर्याय राहतो, असा आग्रह धरणाऱ्या आम्हाला आणि समस्त नागरीकांना डॉ.शिंदे यांची हार्वर्ड-वारी आशेची नवी वाट दाखवेल, अशी अपेक्षा आहे.