प्रमाणपत्रांच्या ‘फॉरेन्सिक’ तपासणीची राष्ट्रवादीची मागणी
ठाणे: ठाणे महापालिकेतील मुंब्रा प्रभाग ३०-ब मधील ‘कैसे हराया’ फेम एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शहर उपाध्यक्ष जावेद सिद्दीकी यांनी पत्रकार परिषद घेतली. या प्रकरणात गंभीर अनियमितता असल्याने सहर शेख
यांच्या सर्व प्रमाणपत्रांची फॉरेन्सिक तपासणी करावी, अशी मागणी केली आहे.
ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने पाच जागा जिंकल्या, यात मुंब्रा प्रभाग ३० ब मधून सहर शेख या निवडून आल्या आहेत. त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या महिला उमेदवारांचा पराभव केला. यातील एक पराभूत उमेदवार फराह सिद्दीकी यांनी सहर शेख यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोप केला. त्यानंतर युनूस शेख आणि सहर शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व दस्तऐवज खरे असल्याचा केलेला दावा जावेद सिद्दीकी यांनी फोल ठरविला. ठाणे महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाने दिलेल्या एबी फॉर्ममध्ये ठाणे महापालिकेचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. निवडणुकी दरम्यान उमेदवारांची कागदपत्रे सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात आलेली नव्हती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सहर शेख यांनी, जात पडताळणी विभागाकडून मिळाल्याचा दावा केलेली प्रमाणपत्रे संशयास्पद असून याची तपासणी संबंधित यंत्रणांनी करावी. तसेच त्यांचे आजोबा झहुर अहमद यांचा मूळ रहिवास उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील असताना, त्यांचा जन्म मुंबईत दाखवण्यात आल्याबद्दलही सखोल चौकशीची गरज असल्याचे सिद्दीकी यांनी सांगितले.
याशिवाय, सहर शेख यांच्या वडिलांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्येही विसंगती आहेत. जात प्रमाणपत्रावरील आधीच्या प्रतीत स्वाक्षरी नसणे, ‘स्टेट ऑफ महाराष्ट्र’ऐवजी केवळ ‘स्टेट ऑफ…’ असा अपूर्ण उल्लेख, तसेच कागदपत्रांमधील नावांमध्ये बदल या बाबी संशय निर्माण करणाऱ्या असल्याचे सिद्दीकी यांनी नमुद केले. यावरून सहर शेख या स्थलांतरित ठरत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सहर शेख यांनी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून राजकीय दबाव आणला जात असल्याच्या आरोपाचेही सिद्दीकी यांनी खंडन केले. अजित पवार गटाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करताना केवळ सहर शेख यांच्याबद्दल नव्हे तर यापूर्वी अशाप्रकारे पाच लोकप्रतिनिधींच्या कथित बोगसगिरीचा पर्दाफाश केल्याचा दावा सिद्दीकी यांनी केला आहे.