टिटवाळा : आई येतो गं… असा निरोप घेऊन सुट्टी घालवण्यासाठी ठाण्याच्या दिव्यावरून आपल्या मुळगावी मुरबाडला निघालेल्या तीन सख्या भावंडांवर आज काळाने झडप घातली. स्नेहा मोहपे (२२), मानसी मोहपे (२०) आणि प्रथमेश मोहपे (१७) अशी या तीन भावंडांची नावे आहेत.
कल्याण- मुरबाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ११ प्रवाशांमध्ये या तीन भावंडांचा समावेश असून पोटच्या पोरांच्या मृत्यूची बातमी ऐकताच एकल आईवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सुन्न मनाने ती आई मुरबाड येथील पर्हे गावी पोहचली असून तेथेच या तिघांना ती अखेरचा निरोप देण्याची वेळ नियतीने तिच्यावर लादली आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर रायते येथे सोमवारी सकाळी ईको पिकअप गाडी आणि सिमेंट मिस्करच्या धडकेत ११ प्रवासी जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच प्रवाशांच्या नातेवाईकांनी हंबरडा फोडत गोवेली ग्रामीण रुग्णालय गाठले. यामध्ये मोहपे कुटुंबातील नातेवाईकांचाही समावेश होता. या कुटुंबातील तीन तरुण भावंडांनी या अपघातात आपला जीव गमावला.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाड येथील पर्हे गावातील हे तिघे मुळे रहिवासी होते. दहा वर्षांपूर्वी वडीलांचे निधन झाल्यानंतर पोटापाण्याच्या शोधात आई अंजनासोबत ही तिन्ही भावंडे ठाण्यातील दिवा येथे राहण्यास आले. भाड्याच्या खोलीत राहून आई या तिघांचा सांभाळ करत होती. धुणीभांडी करून तिने या तिन्हे लेकरांना शिकवले होते. ठाण्यातील महाविद्यालयात दोनजण शिक्षण घेत होते. तर मोठी बहिण नोकरीच्या मार्गावर होती. सुट्टी असल्याने स्नेहा, मानसी आणि प्रथमेश हे तिघे आपल्या मुळ गावी काकांच्या घरी चार- पाच दिवसांसाठी सोमवारी सकाळी निघाले होते. दिवा ते कल्याण त्यांनी लोकलने प्रवास केला. तर पुढे ईको पिकअपमधून त्यांनी मुरबाडचा रस्ता धरला. पण गावी पोहचण्याआधीच मृत्यूने त्यांना गाठले आणि क्षणात एका आईचा आधार कायमचा नियतीने हिरावून घेतला.
चार घरची धुणीभांडी करून आपल्या मुलांना अंजना मोहपे शिक्षण देत होत्या. पुढे ही तिन्ही मुले आपल्या पायावर उभे राहतील आणि आपल्या म्हातारपणाचा आधार बनतील अशी सर्वसामान्य आईसारखी तिची साधी इच्छा होती. आपल्या आईची इच्छा पूर्ण करून तिला सुखाचे दिवस दाखवावे ही स्वप्ने त्या मुलांनीही पाहिली होती. अनेकवेळा त्यांनी हे आपल्या नातेवाईकांना बालूनही दाखवले होते. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. भविष्यातील स्वप्ने अपूर्ण राहिली आणि आईला पोरके करून ही मुले देवाघरी गेली. या घटनेमुळे पर्हे गावात शोककळा पसरली. सायंकाळी जड अंतकरणाने या घटनेची माहिती या भांवंडांच्या आईला देण्यात आली. हंबरडा फोडत ती पर्हे गावात पोहचली असून तेथेच या तिन्ही भावंडांवर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.