मृत्यूशी झुंज देत चिमुकल्याला मिळाले नवजीवन

भाईंदर: वसई येथे झालेल्या क्रूर हल्ल्याचा बळी ठरलेला आणि वोक्हार्ट रुग्णालयात गंभीर अवस्थेत दाखल झालेला चार वर्षांचा चिमुकला मृत्यूशी झुंज देत आता पूर्णपणे बरा होऊन घरी परतला आहे.

डोक्याला जबर मार लागल्याने चिमुकल्याला मीरा रोड येथील वोक्हार्ट रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयामधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि उच्च दर्जाच्या उपचारांमुळे या मुलाला नवीन जीवन प्राप्त झाले. रुग्णालयात दाखल होताना मुलाची प्रकृती अत्यंत नाजूक आणि बेशुद्ध अवस्थेत होता. तत्काळ करण्यात आलेल्या सीटी स्कॅनमध्ये मेंदूत अनेक ठिकाणी रक्तस्राव आढळला, जो गंभीर मेंदू दुखापतीचे लक्षण होते. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित प्रगत आणि जीव वाचवणारे उपचार सुरू केले.
या चिमुकल्यावर उपचार करणारे डॉ. अंकित गुप्ता, कन्सल्टंट व प्रमुख-पेडियाट्रिक क्रिटिकल केअर मेडिसिन, यांनी सांगितले, “मुलाला मध्यम स्वरूपाची डिफ्यूज अॅक्सोनल इन्ज्युरी झाली होती, जी मेंदूची अत्यंत गंभीर दुखापत मानली जाते. आम्ही त्वरित मेंदूची सूज कमी करण्यासाठी अँटी-एडिमा उपचार आणि झटके टाळण्यासाठी अँटी-कन्व्हल्संट औषधे सुरू केली. सातत्यपूर्ण देखरेख आणि वेळेवर उपचारांमुळे त्याची प्रकृती स्थिर करण्यात आम्हाला यश आले.”

उपचारादरम्यान मुलाच्या उजव्या हातात कमजोरीही आढळून आली, जी या दुखापतीचा परिणाम होता. यासाठी फिजिओथेरपीसह एक समग्र पुनर्वसन योजना सुरू करण्यात आली. हळूहळू मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली आणि त्याच्या शुद्धी व प्रतिसादात सकारात्मक बदल दिसून आला.
याबाबत डॉ. सुशील कुमार, सेंटर हेड, वोक्हार्ट हॉस्पिटल्स यांनी सांगितले, “ही केवळ वैद्यकीय यशाची गोष्ट नाही, तर एका नाजूक जीवाला वाचवण्याची कहाणी आहे. आमच्या डॉक्टर, नर्सिंग आणि पुनर्वसन टीमच्या समन्वित प्रयत्नांमुळे या मुलाला वेळेवर आणि प्रगत उपचार मिळू शकले. अशा क्षणांमुळेच आमच्या सेवाभाव आणि समर्पणाच्या मूल्यांची प्रचिती येते.”