छेडछाड करणाऱ्या टोळक्याला शिवसैनिकांनी शिकवला धडा

ठाणे : ठाणे पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेरील ग्रीन वाईन्स समोरील परिसरात काही मद्यधुंद तरुणांकडून महिलांची छेडछाड केली जात असल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर शिवसैनिकांनी थेट घटनास्थळी धडक देत संबंधितांना चांगलाच धडा शिकवला.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कॅनरा बँकेच्या परिसरात काही टपोरी तरुणांचा सतत वावर असतो. हे तरुण वाईन शॉपमधून दारू घेऊन उघड्यावरच पित बसतात आणि ये-जा करणाऱ्या महिलांवर अश्लील टिप्पणी करत त्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून वारंवार होत होत्या.

दरम्यान, मार्केट परिसरातून ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात असताना एका तरुणीसोबत छेडछाड झाल्याची घटना घडली. घाबरलेल्या अवस्थेतही त्या तरुणीने धाडस दाखवत ही माहिती तत्काळ एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे स्थानिक शिवसैनिकांपर्यंत पोहोचवली.

माहिती मिळताच शिवसेना उपशहर प्रमुख प्रकाश कोटवानी, रोहित गायकवाड आदी शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यापैकी एकाला पकडून शिवसैनिकांनी चांगलाच चोप देत इतरांना इशारा दिला. याचवेळी वाईन शॉपच्या दुकानदारालाही जाब विचारण्यात आला.