ठाण्यातील बांधकाम व्यवसायावर नाही आखाती युद्धाचा परिणाम

* क्रेडाई-एमसीएचआयचे स्पष्टीकरण
* ठाण्यात १८-१९ एप्रिलला भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन

ठाणे: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सध्या तरी ठाण्यातील बांधकाम व्यवसायावर कोणताही परिणाम झालेला नाही, अशी माहिती ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’चे विद्यमान अध्यक्ष सचिन मिराणी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘एमसीएचआय है तो भरोसा है’ ही टॅगलाईन घेऊन यंदा १८ व १९ एप्रिल रोजी भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे पश्चिमेतील बाळकूम येथील ‘दोस्ती वेस्ट काउंटी’ येथे हे प्रदर्शन भरविण्यात येणार असून सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत ग्राहकांना भेट देता येणार आहे. या प्रदर्शनामध्ये ग्राहकांना शेकडो गृह व वाणिज्य प्रकल्पांमधून आपल्या पसंतीची मालमत्ता निवडण्याची संधी मिळणार आहे. तसेच गृहकर्जासाठी विविध नामांकित बँका व खासगी वित्तीय संस्थांची दालनेही येथे उपलब्ध असणार आहेत. या पत्रकार परिषदेला संस्थेचे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा, सचिव फैय्याज विराणी, पुनर्विकास समितीचे अध्यक्ष महेश बोरकर, भावेश गांधी, प्रॉपर्टी प्रदर्शन समितीचे अध्यक्ष विभव बोरकर, खजिनदार जय व्होरा, युवा शाखेचे अध्यक्ष निमित मेहता, सुमित गुथा यांच्यासह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

गेल्या २२ वर्षांत ‘क्रेडाई-एमसीएचआय, ठाणे’ संस्थेने प्रदर्शनांच्या माध्यमातून अनेक गृहनिर्माण प्रकल्प सादर केले असून हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यात योगदान दिले आहे. तसेच व्यावसायिकांनाही वाणिज्य मालमत्ता उपलब्ध करून देण्यात संस्थेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे, असे मिराणी यांनी सांगितले.

ठाणे शहरात रिअल इस्टेट क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असून आधुनिक जीवनशैलीला साजेसे प्रकल्प उभे राहत आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना नवीन गृहपर्याय, गुंतवणुकीच्या संधी, सरकारी धोरणे तसेच गृहसजावट व अंतर्गत रचनेविषयी माहिती मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘महारेरा’ कायद्याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रम, कौटुंबिक विषयांवरील उपक्रम यांचेही आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांचे समाधान होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. घर खरेदीस इच्छुक कुटुंबांना एकाच ठिकाणी विविध पर्याय उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात येत असल्याचे निर्वाचित अध्यक्ष गौरव शर्मा यांनी सांगितले.