लाच मागणाऱ्या पोलीस निरीक्षकाची बदली

भाईंदर : काशिमीरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे दरमहा १५ हजार रुपयांचा ‘हप्ता’ (लाच) मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
काशिमीरा वाहतूक विभागात कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज गोलार यांनी एका महिला हवालदाराकडे नाक्यावर ‘लाईट ड्युटी’ (सोयीचे पोस्टिंग) देण्यासाठी दरमहा १५ हजार रुपयांची मागणी केली होती. महिला कर्मचाऱ्याने या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पुराव्यासह तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर, ३० मार्च २०२६ रोजी काशी मिरा पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सागर इंगोले आणि एएसआय गोलार यांच्यावर लाचखोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपांची गंभीर दखल घेत इंगोले यांची पेल्हार पोलीस ठाण्यात तडकाफडकी बदली करण्यात आली असून, वाहतूक पोलीस विभागातील ‘हप्ता’ रॅकेट उघडकीस आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.