३,७४९ उद्योजकांना कर्ज मंजूर; सुमारे १६ हजार युवकांना रोजगार
ठाणे : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत कोकण विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत ३,७४९ उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. या माध्यमातून सुमारे १६ हजाराहून अधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
चालू आर्थिक वर्षासाठी कोकण विभागाला एकूण ४,४५२ प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला २,६७१ आणि खादी व ग्रामोद्योग यंत्रणेला १,७८१ प्रकरणांचे उद्दिष्ट होते. या पार्श्वभूमीवर विभागाने १११.५७ टक्के कामगिरी करत २,९८० उद्दिष्ट पूर्ण केले असून एकूण ३,७४९ कर्ज प्रकरणांना मंजुरी मिळाली आहे. या प्रकरणांमध्ये सुमारे ८४ कोटी रुपयांच्या अनुदानाचा समावेश आहे.
कोकण विभागाने सलग तिसऱ्यांदा १०० टक्क्यांपेक्षा अधिक उद्दिष्टपूर्ती केली आहे. जिल्हानिहाय कामगिरीत रत्नागिरी जिल्ह्याने सर्वाधिक १३०.६४ टक्के उद्दिष्ट पूर्ण करत आघाडी घेतली. त्यानंतर रायगड (१००.५०%), सिंधुदुर्ग (१२३.३३%) आणि पालघर (१०३.३०%) जिल्ह्यांनीही उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. ठाणे जिल्ह्याने ६१.६५ टक्के कामगिरी करत विभागाच्या एकूण उद्दिष्टात योगदान दिले.
मंजूर प्रकरणांपैकी ९१४ उद्योग उत्पादन क्षेत्रातील तर २,८३५ सेवा क्षेत्रातील आहेत. विशेष म्हणजे या प्रकल्पांमध्ये सुमारे ५० टक्के महिला व मागासवर्गीय उद्योजकांचा सहभाग आहे. तसेच कोकण विभागाने अनुदान वितरणात राज्यात तिसरा क्रमांक पटकावला असून ९३५ प्रकरणांमध्ये (२१%) अनुदान वितरित करण्यात आले आहे.
या यशामागे विकास आयुक्त (उद्योग) दिपेंद्रसिंह कुशवाह यांचे नेतृत्व तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले आहे. उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या समन्वयातून ही कामगिरी साध्य झाली.