प्रेसिडेंट कप : आज सिने कलाकार मैदानात

ठाणे : भारतातील क्रिकेट रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या प्रेसिडेंट कप २०२६ मध्ये उद्या सिने अभिनेते आणि अभिनेत्री खेळताना दिसणार आहेत. क्लॅश ऑफ सेलिब्रिटीज, क्लॅश ऑफ सुपरस्टार्स’ या टॅगलाईनसह सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार उद्या शनिवारी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर संध्याकाळी ५ वाजता हा हाय-व्होल्टेज सामना खेळवला जाणार आहे.

या विशेष सामन्यात मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शक संजय जाधव आणि लोकप्रिय अभिनेता सौरभ गोखले यांचे दोन स्वतंत्र संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि फेडरेशनचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेसिडेंट कपचे आयोजन करण्यात आले आहे.

सौरभ गोखले संघात कल्याणी जाधव, ऋतुराज फडके, माधव देवचके, शुभंकर तावडे, आदिश वैद्य, तेजस बर्वे, अमोल नाईक, महेश लिमये, सक्षम कुलकर्णी, मंगेश बोरगावकर, राजेश भोसले, देवेंद्र शेलार, अभिलाष चौधरी आणि तेजस नेरुरकर यांसारख्या नामवंत कलाकारांचा समावेश आहे. तर दिग्दर्शक संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील संघात संजना पाटील, हर्षद अतकरी, पृथ्वीक प्रताप, शशांक केतकर, सिद्धार्थ बोडके, ओमप्रकाश शिंदे, अभिनय बेर्डे, अक्षय केळकर, सुशांत शेलार, उमाकांत पाटील, विवेक सांगळे, रोहित शिवलकर, सुयश टिळक आणि विनय राऊत हे कलाकार मैदानात उतरणार आहेत.

टेनिस क्रिकेटच्या या महाकुंभात मनोरंजन विश्वातील तारे-तारका , प्रत्यक्ष मैदानात क्रिकेट खेळणार आहेत. सामना ‘टेनिस क्रिकेट’ फॉरमॅटमध्ये होणार असल्याने त्यात मोठ्या प्रमाणात चौकार आणि षटकारांची आतिशबाजी पाहायला मिळेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे. हे सामने सर्वांसाठी मोफत आहेत.