कल्याण: कल्याण शहाड पुलावर एका टेम्पोने दुचाकी चालकास जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकी चालक डॉक्टर सोमनाथ पाटील यांचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी टेम्पोचालक बॉबी जुनी याला अटक केली आहे. टेम्पो चालक जुनी हा उल्हासनगरचा राहणारा आहे.
डॉक्टर पाटील हे खडकपाडा परिसरात राहतात. त्यांचा दवाखाना कल्याण-मुरबाड मार्गालगत असलेल्या म्हारळ गाव परिसरात आहे. पाटील हे त्यांच्या दुचाकीवरुन म्हारळच्या दिशेने जात होते. शहाड पुलावर एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत डॉक्टर पाटील हे खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी टेम्पो चालक जुनी याला अटक केली. जुनी याला अटक करुन कल्याणच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जुनी याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉक्टर पाटील यांच्या अपघाती मृत्यूमुळे कल्याण-डोंबिवलीतील वैद्यकीय व्यवसायिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.