राज्यात अवकाळी पावसाचा जोर

मुंबई: राज्यातील अनेक जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातही पावसाने दमदार आगमन केले.

कडक उन्हाळ्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच त्यांना पावसाच्या हलक्या सरींनी गारवा अनुभवायला मिळाला. मात्र, अवकाळी आलेल्या या पावसाने शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत असल्याचे दिसून आले.

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. फळभाज्या, पालेभाज्यासह कलिंगडाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी झाली. उन्हाळी भात पिकाला याचा फायदा होणार असला तरी, कापणीला आलेले पीक आणि पालेभाज्यांना याचा काही प्रमाणात फटका बसणार आहे. मराठवाड्यात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीट अवकाळी पावसामुळे १२२ गावांतील ५४०९ शेतकऱ्यांना फटका बसला असून, ३२६१ हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक २६६५ हेक्टरवरील नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहे.

बीड जिल्ह्यात फळ गळतीने बागांचे नुकसान झाले आहे. तसेच, धाराशिव जिल्ह्यात देखील अवकाळीचा पुन्हा तडाखा बसला. वादळवाऱ्याने आणि गारपिटीने आंब्याला मोठा फटका बसला असून बळीराजाचे नुकसान झाले. लातूरमध्ये अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांचे कंबरडे मोडले असून खराब झालेले टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा तडाखा बसला, ज्यामध्ये हजारो हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली आहेत. वाशिम जिल्ह्यातही वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याचे नुकसान झाले. नागपूर जिल्ह्याला मध्यरात्री अवकाळी पावसाने चांगले झोडपले, सतत दोन तास झालेल्या या पावसाने विशेष करुन पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आणि साक्री तालुक्याला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसला. तर, नागपुरातील कळमना एपीएमसी मार्केटमध्ये अवकाळी पावसात शेकडो पोती धान्य भिजले. धाराशिवमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा बसला. टॉमेटो शेती जमीनदोस्त झाली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कळंब तालुक्यातील बहुला शिवारातील शेतकऱ्यांच्या टोमॅटो पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस झाला असून पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असून नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

“राज्यात वादळी वारा व गारांच्या पावसामुळे (अवकाळी) एक लाख २२ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यभरातील नुकसानीची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन तातडीने पंचनामे पूर्ण करुन बाधित शेतक-यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल” अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.