ठाणे : ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात गरिबांना आणखी चांगली सुविधा मिळावी यासाठी महापालिकेच्या प्रत्येक सदस्याने नगरसेवक निधीतून फक्त २५ हजार रुपये द्यावेत, अशी सूचना ज्येष्ठ नगरसेवक योगेश जानकर यांनी केली आहे.
महापालिकेच्या अर्थसंकल्पावर मागिल तीन दिवस चर्चा सुरु आहे शिवसेनेचे नगरसेवक श्री.जानकर यांनी चर्चेत भाग घेताना उत्पन्न वाढीबरोबर विविध नागरी सुविधांची कामे करण्याची सूचना केली. महापालिकेच्या रुग्णालयांत मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते. या रुग्णांना चांगल्या प्रकारच्या आणखी सुविधा मिळाव्यात, याकरिता नगरसेवकांना मिळणाऱ्या सव्वा कोटी नगरसेवक निधीतून २५ हजार इतका निधी रुग्णालयाना द्यावा, अशी सूचना केली.
शहरातील महापालिकांचा शैक्षणिक दर्जा सुधारत असून वागळे भागातील डी मार्ट शाळेत आत्ता पाचवी तुकडी काढावी लागत आहे, त्यामुळे याच भागातील शांती नगर येथिल शाळेत इंग्लिश शाळा सुरु करण्याची त्यांनी मागणी केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुंब्रा-कळवा भागाचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे तर ठाणे परिसरातील नागरी सुविधांच्या कामाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणावर निधी दिला त्यामुळेच ठाण्याचा विकास होत असल्याचा दावा श्री. जानकर यांनी केला. उपमुख्यमंत्री श्री.शिंदे महापालिकेचे सभागृह नेते असताना त्यांनी वागळे भागातील आयटी कंपन्यांना प्रोविजनल टॅक्स लावण्याची मागणी केली होती,परंतु महापालिकेने वाणिज्य टॅक्स लावल्याने महापालिकेचे उत्पन्न म्हणावे तसे वाढले नसल्याचे श्री. जानकर म्हणाले. श्री. शिंदे यांनी केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी श्री. जानकर यांनी केली. या चर्चेदरम्यान त्यांनी शेरोशायरी करून विरोधकांना चिमटे देखील काढले.