घोडबंदरची साडेपाच तास वीजकोंडी

ठाणे : घोडबंदर मार्गावर होणाऱ्या नेहमीच्या वाहतूक कोंडीत आज वीज कोंडीचाही फटका बसला. रविवारी सकाळी सहाच्या सुमारास शहरातील घोडबंदर रोड, वसंत विहार आणि आसपासच्या परिसरात अचानक वीजपुरवठा खंडित झाला, आणि दुपारी साडे अकरा वाजता तो सुरळीत झाला. दरम्यान ऐन उकाड्यात नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वाशी परिमंडळातील ठाणे भागात आज सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पडघे-वाडा वीजवाहिनीवर क्षमतावाढीसाठी कुडूस उपकेंद्र जोडणीचे काम सुरू होते. याचदरम्यान पातलीपाडा येथील २२०/१००/२२ केव्ही उपकेंद्राशी संबंधित पडघा-कांबा-खारबाव-कोलशेत ही वीजवाहिनी ट्रिप होऊन ठाणे शहरातील बहुतांश ठिकाणी बत्ती गूल झाली. यात कोलशेत परिसर, घोडबंदरचा शहरी भाग तसेच वाडा येथे वीजपुरवठा खंडित करावा लागल्याची माहिती महावितरणने दिली.
या बिघाडानंतर महापारेषण आणि महावितरणने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले. काही भागात पर्यायी मार्गाने टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरू करण्यात आला. अखेर सकाळी ११.३० वाजेपर्यंत सर्व भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. दरम्यान दीर्घकाळ वीजपुरवठा खंडित राहिल्याने  वागळे इस्टेट, वसंत विहार, घोडबंदर रोड, ओळवा आणि कोलशेत परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागला.  एकीकडे तापमानाचा पारा वाढलेला असताना ऐन सुट्टीच्या दिवशी वीजपुरवठा खंडीत झाल्याने ठाणेकरांची सकाळ घामाघूम ठरली.