भिवंडी मनपा उपायुक्तांविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

भिवंडी : भिवंडी महापालिकेतील प्रभाग समिती क्र.१ ते ५च्या झोपडपट्टी विभागातील नऊ कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस न बजावता त्यांना १८ मार्च २०२६ पासून तडकाफडकी निलंबित केले. या प्रकरणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटतर्फे लेखी पत्र देऊन चर्चा करण्यात आली. मात्र पालिका आयुक्तांनी कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने महासंघाच्या कामगारांनी काल शनिवारपासून काळ्याफिती लावून काम सुरु केले आहे.
महापालिकेतील नऊ कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याप्रकरणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटचा पदाधिकाऱ्यांनी १८मार्च २०२६ रोजी मनपा प्रशासनाला पत्र दिले होते. त्या पत्रानुसार महापौर  व आयुक्त यांच्यासोबत चर्चा झाली. तरी सुध्दा त्यांनी अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे निर्णय घेतलेला नाही. म्हणून २३ मार्च २०२६ रोजी महापौर नारायण चौधरी यांच्या दालनांत चर्चा झाली. मात्र पाच दिवस झाले तरी निर्णय झाला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. परिणामी महासंघाने प्रशासनास स्मरणपत्र देत २८ मार्चपासून प्रभाग समिती क्र.१ ते ५ सर्व वसूली कर्मचारी यांनी ५ एप्रिलपर्यंत पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा निषेध करीत काळ्याफिती लावून वसुलीचे काम सुरु ठेवले आहे.
या कालावधीमध्ये ४ एप्रिलपर्यंत मनपा प्रशासनाने योग्य पर्यायी मार्ग म्हणून निर्णय घेतला नाही, तर ६ एप्रिलपासून महापालिकेसमोर दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यात भारतीय कामगार कर्मचारी महासंघ कर्मचाऱ्यांसोबत बेमुदत साखळी उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.
प्रभाग समिती क्र.१ ते ५ झोपडपट्टी विभागातील नऊ प्रभाग लिपीकांना १८ मार्चपासून निलंबित केल्याने महापालिकेचे अडीच ते तीन कोटी रूपयाचे नुकसान झालेले आहे. याला जबाबदार उप आयुक्त (कर) विभाग व उप आयुक्त (सामान्य प्रशासन) हे जबाबदार आहेत. ही रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ, भिवंडी युनिटच्या वतीने आयुक्तांकडे केली आहे.