शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीएमार्फत आनंद नगर ते साकेतपर्यंत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी 813 मि.मि. व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून 900 मि.मि. व्यासाची जलवाहिनी 2200 मीटर पैकी 520 मीटर अंतरापर्यंत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे.

एमएमआरडीएने 520 मीटर अंतरापर्यंत अस्तित्वातील 813 मि.मि. व्यासाची जलवाहिनी निकामी करून नव्याने अंथरण्यात आलेली 900 मि.मि. व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरीता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. त्यानुसार या कामाकरीता शुक्रवार, 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते रविवार, 28 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एकूण 24 तास पाणी पुरवठा बंद राहील.

या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिका अंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवले नगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं 2, 3 व 4 चैत्तीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसन नगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रूपादेवी पाडा, रामनगर, सी. पी. तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी पूर्ण पणे बंद राहील. पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल, याबाचत नागरिकांना अवगत करण्यात येईल. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.