कोणतीही करवाढ नसलेला ठामपाचा ६२२१ कोटींचा अर्थसंकल्प सादर
ठाणे: सोमवारी सन २०२६-२७ या वर्षाकरिता ६२२१ कोटी १२ लाख रुपयांचा मूळ अर्थसंकल्प महापौर शर्मिला पिंपळोलकर यांना सादर केला. या अर्थसंकल्पात कोणत्याही करवाढीचा समावेश नसला तरी करवसुलीत येणारे अपयश आणि २१०० कोटींचे दायित्व यामुळे अनुदानाच्या जोरावर विकासकामे करण्यासाठी महापालिकेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
सोमवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी चार वर्षांनंतर महासभेत २०२६-२७ आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प सादर केला. गेल्यावर्षी ५६२५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा त्यामध्ये सुमारे ६०० कोटींची भर पडल्यामुळे अर्थसंकल्प ६२२१ कोटींवर गेला आहे.
पालिकेवर असलेल्या २१०० कोटींच्या एकूण दायित्वाचे तीन मुख्य भागांत वर्गीकरण करण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. ठाणे महापालिकेने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध विभागांकडून १९०० कोटी रुपयांच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र, प्रत्यक्षात हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आल्याने उत्पन्नात तूट निर्माण झाली आहे. अशातच कोरोना काळात बिघडलेल्या आर्थिक गणितामुळे पालिकेवर अडीच ते तीन हजार कोटींचे दायित्व निर्माण झाले होते. त्यानंतर करवसुलीवर भर देत हे दायित्व कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्या काळात राज्य शासनाकडून मिळालेल्या निधीमुळे दायित्व काही प्रमाणात कमी होऊन ३०० ते ४०० कोटींवर आले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुन्हा दायित्वात मोठी वाढ झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले.
केंद्राच्या विविध योजनांमधील पालिकेचा हिस्सा आणि कामांचे पैसे, राज्याच्या योजनांमधील प्रलंबित देणी आणि पालिकेने हाती घेतलेली विकासकामे आणि कंत्राटदारांच्या देणीमुळे दायित्व वाढल्याचे आयुक्त राव यांनी सांगितले. याबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्तांनी सांगितले की, जरी कागदावर २,१०० कोटींचे दायित्व दिसत असले, तरी अनेक प्रकल्प हे २ ते ३ वर्षांच्या कालावधीचे आहेत. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे, सध्याच्या घडीला पालिकेवर तातडीने फेडावे लागणारे प्रत्यक्ष दायित्व एक हजार ते ११०० कोटींच्या दरम्यान आहे.
मागील वर्षी पालिकेने १९०० कोटींच्या करवसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु ते पूर्ण करण्यात अपयश आले. पाणीपुरवठा, शहर विकास आणि अग्निशमन यांसारख्या महत्त्वाच्या विभागांच्या उत्पन्नात घट झाल्याचे आयुक्तांनी मान्य केले. महसुली उत्पन्न ३,५२३ कोटींवरून ३,४६१ कोटी रुपयांपर्यंत खाली आले आहे. यामुळे भांडवली कामांसाठी निधी उभारताना पालिकेची दमछाक होत आहे.
उत्पन्न वाढीसाठी मालमत्ताकर, पाणी पट्टीसह सर्वच विभागांना यंदा वसुलीचे उद्धीष्ट वाढवून देण्यात आले आहे. मात्र त्यासाठी कोणतीही करवाढ ठाणेकरांवर लादण्यात आलेली नाही. मात्र त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत पालिकेने शोधून काढले आहेत. यामध्ये प्रामुख्याने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच म्हणजे १ एप्रिलपासून बीलांचे वितरण, ई बिलिंगवर भर, जमिनीवर कर आकारणी, अभय योजना, जाहिरात फी वाढ आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत. तसेच बीनव्याजी कर्ज आणि म्युनिसिपल ग्रीन बॉण्डवर भर देण्यात येणार आहे.
पालिकेला डिसेंबर २०२५ अखेर १,२६९ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. जीएसटीचे अनुदान वेळेत मिळत असले तरी नोंदणीशुल्कातून मिळणारे अनुदान रखडले आहेत. परिणामी शासनाकडून मिळणार्या या निधीवरच पालिकेची बरीचशी मदार आहे.
अर्थ संकल्पाचे वैशिष्ट्ये
– एकूण अर्थसंकल्प : ६,२२१ कोटी १२ लक्ष रुपये
– भांडवली खर्च: २,४०१ कोटी ५५ लक्ष रुपये (विकासकामांसाठी)
– महसुली खर्च: ३,८१८ कोटी १७ लक्ष रुपये (पगार व प्रशासकीय खर्च)
– परिवहन अर्थसंकल्प: ७९१ कोटी ८६ लक्ष रुपये
मालमत्ता कर विभागाकडून यावर्षी १२०० कोटींचे अपेक्षित उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याकरिता विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत. स्थानिक संस्था कर विभागाकडून सेवाकर अनुदानातून १३३२ कोटी मुद्रांक शुल्क तीनशे कोटी असे एकूण १६३३ कोटी अपेक्षित उत्त्पन्न धरण्यात आले आहे. शहर विकास विभाग विभाग कडून ६६३ कोटी इतके उत्त्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. जाहिरात फी पोटी ४० कोटी ३५ लाख अपेक्षित उत्पन्न धरण्यात आले आहे. अग्निशमन दलाकडून १३० कोटी उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पाणीपुरवठा विभागाकडून २५० कोटी रुपये उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्थावर मालमत्ता विभागाला सुमारे १७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
घनकचरा विभागासाठी ६४८ कोटी खर्च अपेक्षित असून आतकोली येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. शहरातील रस्त्यांची साफसफाई यंत्रांनी करण्यात येणार आहे. त्याकरिता २० वाहन खरेदी करण्यात येणार आहे. नाल्यांची साफसफाई यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार असून महापालिका देशातील पहिली महापालिका ठरणार आहे.
आरोग्य विभागावर २२३ कोटी खर्च करण्यात येणार असून मातृत्व भेट, पोषण आहार, माझी सखी, कळवा येथिल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील बेडची संख्या ५००वरून ८०० करण्यात येणार आहे. चिट्ठीमुक्त औषधं, जन्म मृत्यू दाखल्याचे डिजिटलायजेशन, भटक्या कुत्र्यांना निवारा, पशुदाहीनी आदी सुविधांवर खर्च करण्यात येणार आहे.
शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्यासाठी ३६४.२७ कोटी इतका खर्च केला जाणार असून विज्ञान मंच, आदर्श शाळा, बालरंगकर्मी, मुलींना कराटे प्रशिक्षण, कल चाचणी तसेच महापालिका सीएसआर फंडातून सीबीएसइची शाळा खारीगाव येथे सुरु करणार आहे. महापालिकेच्या हद्दीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे कोस्टल रोड, ठाणे-बोरीवली ट्वीन टॅनेल, मुंबई-अहमदाबाद हायस्पीड कॉरीडोर, घोडबंदर रोडचा विकास, ऐरोली ते कटाई नाका रोड, ऐरोली-कळवा कॉरीडोर, ओवळा-माजिवडा येथे सायकल ट्रॅक, ठाणे व्हिविंग टॉवर आणि कॉन्व्हेंसशन सेंटर, स्नो पार्क, वाघबीळ येथे तिसरे नाट्यगृह, टेमघर आणि पिसे पाणी पुरवठा केंद्र येथे सोलर सिस्टिम लावून विजेवरील खर्च कमी करण्यात येणार असल्याचे आयुक्त श्री.राव यांनी सांगितले.
मलनिस्सारण पाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी एका खाजगी संस्थेला ४८ रुपये दराने विक्री करण्यात येणार आहे. ई वेहिकल चार्जिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. हरित ठाणे उपक्रम राबून खारफुटीचे रक्षण केले जाणार असल्याचे आयुक्त श्री.राव यांनी सांगितले.