माजी न्यायमूर्ती एम. सय्यद यांचे प्रतिपादन
ठाणे : महापालिका, पोलिस, प्रशासन यांच्यावर सर्रास टीका केली जाते. पण नागरिक म्हणून आपली देखील काही जबाबदारी असते. त्यामुळे केवळ हक्क आणि अधिकारांसाठी भांडू नका तर जबाबदारीचे सुद्धा भान ठेवा, असे उद्बोधक मार्गदर्शन माजी न्यायमूर्ती एम. सय्यद यांनी येथे केले.
रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पाणी दिवसाचे औचित्य साधून पर्यावरण परिसंवादाचे आयोजन केले होते. नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १९ मधील रोटरी सेंटर मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला माजी न्यायमूर्ती एम. सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले, संविधानाने सांगितलेल्या विविध कर्तव्य आणि जबाबदारी याची विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांनी जाणीव करून दिली पाहिजे. केवळ टीका करू नका तर तुमची जबाबदारी ओळखून वागा. एक दुसऱ्यांचा सन्मान करा, पालक शिक्षकांचा सन्मान करा असे मार्गदर्शन सय्यद यांनी विद्यार्थ्यांना केले. आजच्या कार्यक्रमात येऊन आनंद झाला. महापालिकेच्या शाळेतल्या मुलांचा परफॉर्मन्स बघून माझा या शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन या कार्यक्रमामुळे बदलला. या विद्यार्थ्यांकडे असलेले ज्ञान आणि माहिती बघून हे विद्यार्थी या देशाचे आणि शहराचे उत्तम नागरिक म्हणून घडतील असा विश्वास माजी न्यायमूर्ती एम. सय्यद यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या हस्ते पर्यावरण दक्षता मंडळ आणि रोटरीच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या मॉडेल मेकिंग, पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, क्राफ्ट ,पोस्टर मेकिंग स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ झाला. या विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि पर्यावरणपूरक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने एनर्जी रिसोर्सवर डॉ. अनिकेत ठोसर, एअर क्वालिटी इंडेक्सवर प्रा.विद्याधर वालावलकर यांनी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक १०० च्या विद्यार्थिनी यांनी जागतिक पाणी प्रदूषण या सह अन्य दोन ठाणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी चमूने पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अतिशय उत्तम रित्या सादर करत उपस्थितांची दाद मिळवली.
पाण्याचे संवर्धन हे विथ आउट ऍक्शन होत नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनातील छोट्या छोट्या सवयी जरी आपण बदल केला तरी आपण अडीच लाख लिटर पाणी महिन्यासाठी वाचू शकतो, असे आवाहन या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. उमेश मुंडये यांनी केले.