अंबरनाथ येथील डम्पिंग ग्राउंडला आग

धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास

अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील चिखलोलीजवळील सर्वोदयनगर परिसरात असलेल्या डंपिंग ग्राउंडला आग लागल्याने पसरलेल्या धुरामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलातर्फे प्रयत्न सुरू आहेत.

मागील तीन दिवसांपासून डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याने ती धुमसत होती. गुरुवारी आग अधिकच भडकली आगीमुळे संपूर्ण परिसरात दाट धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि दुर्गंधीचाही सामना करावा लागला. डंपिंग ग्राउंडजवळच लोकवस्ती असल्याने वाढत्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचण्यासाठी व्यवस्थित रस्ता नसल्याने अग्निशमन दलाच्या वाहनांना अडचणींचा सामना करावा लागला. भाजपचे पदाधिकारी प्रजेश तेलंगे यांनी डंपिंग ग्राउंडला तीव्र विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया केली जात नसल्याने नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. डंपिंग ग्राऊंडवर नव्याने कचरा टाकणे तत्काळ बंद करावे, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही तेलंगे यांनी दिला. याबाबत त्यांनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेऊन नागरिकांच्या समस्या मांडल्या.

शिवसेना नगरसेवक शैलेश भोईर यांनी नगरपालिका प्रशासनासोबत डंपिंग ग्राउंडच्या समस्येबाबत चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. धुमसणाऱ्या कचऱ्यावर दोन ते तीन दिवसांत माती टाकून धूर कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, लवकरच हे डम्पिंग बदलापूर हद्दीत सुरू असलेल्या एकत्रित घनकचरा प्रकल्पात स्थलांतरित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.