ठाणे : ठाणे शहरात हिंदू मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक उत्साहात भव्य स्वागतयात्रा जल्लोषात पार पडली. पहाटेपासूनच शहरात सणाचा माहोल पाहायला मिळत होता. ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथके, पारंपरिक वेशभूषेतील युवक-युवती आणि विविध सामाजिक संदेश देणारे चित्ररथ यामुळे संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्वागतयात्रेचे यंदा २६ वे वर्ष होते. सकाळी कौपिनेश्वर मंदिरातून पालखीचे प्रस्थान झाले. जांभळीनाका येथे सिद्धीविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. ‘समर्थ ठाणे सशक्त भारत’, ‘वंदे मातरम्’ १५० वर्षे, ‘भारत २०४७’ आणि नागरी कर्तव्ये या संकल्पनांवर आधारित ५८ आकर्षक चित्ररथ सादर करण्यात आले. महिलांची बाईक आणि सायकल रॅली हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी पर्यावरण, सामाजिक जबाबदारी आणि संस्कृती यांवर प्रभावी संदेश दिले. विविध संस्थांनी सादर केलेल्या नृत्य, क्रीडा प्रात्यक्षिके आणि आदिवासी कलांनीही उपस्थितांचे लक्ष वेधले.
या सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळोलकर, उपमहापौर कृष्णा पाटील, भाजप आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, उपायुक्त संदीप माळवी, माजी आमदार रवींद्र फाटक, न्यास संस्थेचे संजीव ब्रह्मे, उत्तम जोशी यांच्यासह इतर नेते मंडळी व संस्थेचे सहकारी उपस्थित होते.
तलावपाळी, चिंतामणी चौक, गोखले रोड या मार्गावर मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून यात्रेचा आनंद लुटला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात आणि उत्साहपूर्ण वातावरणात ठाणेकरांनी नववर्षाचे स्वागत केले.
यंदा ५५ हून अधिक संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्वागत यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे समर्थ भारत व्यासपीठाच्या माध्यमातून तृतीयपंथी समाजातील सदस्यांचा सहभाग होता. गुलाबी रिक्षांमधून सहभागी होत त्यांनी आपल्या हक्कांसाठी ठाम भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला सहानुभूती नको, समान हक्क हवेत. भीक मागण्याची वेळ आता संपली असून आम्हाला रोजगाराच्या संधी द्याव्यात.” तसेच त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे सर्व क्षेत्रांमध्ये समान संधी देण्याची मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळाले पाहिजेत, मग भेदभाव का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या समानतेच्या विचारांची आठवण करून देत प्रत्यक्षात संधी उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली. “मंगलमुखी” अशी नवी ओळख स्वीकारत त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला.
स्वागतयात्रेत सिने कलाकारांची हजेरी
ठाण्यात गुढीपाडवा स्वागत यात्रेत यंदा नागरिकांसह चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. ‘विवाह’ चित्रपटातील अभिनेत्री अमृता राव यांनी नऊवारी साडी नेसून यात्रेत सहभागी होत ठाण्याच्या परंपरेचे कौतुक केले. महिलांचा पारंपरिक वेश, नागरिकांचा उत्साह पाहून त्या भारावल्या. तसेच जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर जगात शांतता आणि स्थिरता नांदावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.