मुंब्र्याला मिळणार तीन पादचारी पुलांची भेट!

* वर्दळीचा महामार्ग ओलांडताना रहिवाशांचा जीव मुठीत
* महासभेत २८ कोटींचा प्रस्ताव

ठाणे: संपूर्ण ठाणे शहरात अत्यंत दाटीवाटीचा भाग म्हणून ओळख असलेल्या मुंब्र्यात सतत वाहनांची वर्दळ आणि बेकायदेशीर पार्किंग यामुळे रस्ता सुरक्षित ओलांडणे ही नागरीकांसाठी रोजची अग्निपरीक्षा झाली आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या रहिवाशांना जग जिंकल्याचा आनंद होत असल्यास नवल वाटू नये. मात्र ही अग्नीपरीक्षा सोपी होणार असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिकेच्या आगामी महासभेत २८ कोटींच्या खर्चाचा तीन पादचारी पुलांचा प्रस्ताव असून लवकरच मुंब्रावासींना ही भेट मिळण्याची चिन्हे आहेत.

जड-अवजड वाहनांची सतत वर्दळ असलेल्या वाय जंक्शन ते कल्याणफाटा दरम्यान सिबलीनगर, दोस्ती कंपाऊंड आणि फायर ब्रिगेडसमोर या तीन ठिकाणी हे पादचारी पूल उभारण्याची योजना आहे. प्रत्येक पादचारी पूल सुमारे ६० मीटर लांबीचा आणि चार मीटर रुंदीचा असणार आहे. दोन्ही बाजूंना चढ-उतारासाठी जिना तसेच रॅम्पची सुविधा असणार आहे. या तीनही पूलांच्या बांधकामासाठी सुमारे २७ कोटी ७२ लाख रुपयांचा अंदाजित खर्च प्रस्तावित करण्यात आल्याचे कळते. महापालिकेच्या अर्थसंकल्पातील पादचारी पूल/सबवे या लेखाशिर्षकातून हा खर्च करण्याचा प्रस्ताव असून यासाठी प्रशासकीय व आर्थिक मान्यता तसेच महासभेची मंजुरी घेण्यात येणार आहे.

मुंब्रा परिसरातील या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात नागरी वसाहती, शाळा, बाजारपेठा आणि व्यावसायिक आस्थापना आहेत. हा मार्ग तळोजा, पनवेल आणि जेएनपीटीकडे जाणारा महत्त्वाचा असल्याने येथे कंटेनर आणि मालवाहू वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. सतत वाहनांची वर्दळ असलेल्या या रुंद महामार्गावर नागरिकांना रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे. स्थानिक नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी येथे पादचारी पूल उभारण्याची मागणी केली होती. वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त पाहणी करण्यात आली. या पाहणीनंतर सिबलीनगर, दोस्ती कंपाऊंड आणि फायर ब्रिगेडसमोर या तीन ठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

बेशिस्त वाहनचालक रहिवाशांच्या जीवावर

या महामार्गावर जड-अवजड वाहनांची सतत येजा सुरू असते. ही वाहने वेगाची स्पर्धा करत असल्याने रहिवासी रस्ता ओलांडताना जीव मुठीत घेतात. अशा परिस्थितीत येथील रिक्षा, टेम्पो, दुचाकी वाहने देखिल बेशिस्तपणे वाहने हाकत असतात. विशेष म्हणजे दोन्ही बाजूला बेकायदेशीरपणे पार्किंग केल्याने रहिवाशांना चालण्यासही रस्ता मिळत नाही. हे पादचारी पूल उभारताना येथील वाहतूक व्यवस्थाही सक्षम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.