सिलेंडर तुटवडा: ठाण्यात काँग्रेसची घोषणाबाजी

ठाणे : केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याचबरोबर घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडाही निर्माण झाला आहे, असे सांगत केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

पश्चिम आशियातील इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका या संघर्षाचे परिणाम आता जगभरात जाणवू लागले आहेत. देशासह राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ करण्यात आली आहे. एकीकडे महागाई वाढत असतानाच, दुसरीकडे गॅसचे दर वाढविण्यात आल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात दर वाढूनही गॅस सिलिंडरचा पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. अनेकांनी इलेक्ट्रीक शेगडीचा वापर सुरू केला आहे. तर, ग्रामीण भागात पुन्हा चुल पेटविण्यास सुरुवात झाली आहे. हाॅटेल, उपहारगृहही बंद होण्याच्या मार्गावर असून तेथील कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची भिती व्यक्त होत आहे.

केंद्र सरकारने घरगुती तसेच व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली असून त्याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे राज्यव्यापी आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गुरुवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. ठाणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश सदस्य, सेल अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष,वॉर्ड अध्यक्ष, महिला काँग्रेस, तसेच युवक काँग्रेस, एन. एस. यु. आय. सह सर्व स्तरांतील काँग्रेस पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. “ पोटात पडली आग पण, मोदींनी केला सिलिंडर महाग”, अशी घोषणा कार्यकर्त्यांनी केली.

केंद्र शासनाने गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अचानकपणे फार मोठी दरवाढ केलेली असून सिलेंडर नोंदणीचा कालावधी सुद्धा वाढवण्यात आलेला आहे. त्याचा विपरीत परिणाम देशातील प्रत्येक कुटुंबावर होत असून आधीच महागाईने त्रस्त असलेली जनता या दरवाढीने होरपळून निघत आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे विक्रांत चव्हाण यांनी सांगितले.